Shiv Sena: बहुतांश आमदारांनी ठाकरेंची साथ सोडली, खासदार कोणाच्या बाजूने? समोर येतेय अशी माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2022 09:16 AM2022-06-24T09:16:47+5:302022-06-24T09:18:54+5:30
Shiv Sena Crisis: शिवसेनेचे एकामागून एक आमदार एकनाथ शिंदे यांच्या मागे गुवाहाटीला जात असताना पक्षाचे काही खासदारही बंडखोरांच्या गोटात दाखल होत असल्याच्या आणि त्यांना संपर्क केला जात असल्याच्या बातम्या येत आहेत. या पार्श्वभूमीवर लोकमत चमूने प्रत्येकाशी बोलून घेतलेला हा मागोवा...
शिवसेनेचे एकामागून एक आमदार एकनाथ शिंदे यांच्या मागे गुवाहाटीला जात असताना पक्षाचे काही खासदारही बंडखोरांच्या गोटात दाखल होत असल्याच्या आणि त्यांना संपर्क केला जात असल्याच्या बातम्या येत आहेत. या पार्श्वभूमीवर लोकमत चमूने प्रत्येकाशी बोलून घेतलेला हा मागोवा...
अरविंद सावंत, दक्षिण मुंबई
- आता कुठे : मुंबईत असून, शिवसेना नेत्यांच्या संपर्कात आहेत.
श्रीकांत शिंदे, कल्याण
- आता कुठे : ठाण्यातील घरीच
या विषयावर आपल्याला काहीही भाष्य करायचे नसल्याचे त्यांनी स्पष्ट
केले. या दोघांचाही आजपर्यंतचा राजकीय प्रवास विचारता घेता त्यांचा पाठिंबा एकनाथ शिंदे यांना असू शकतो.
गजानन कीर्तिकर, उत्तर-पश्चिम मुंबई
- आता कुठे : मुंबईतच आहेत
गेली अनेक वर्षे स्थानिक लोकाधिकार समितीची धुरा वाहणाऱ्या कीर्तिकर यांनी आपण शिवसेनेसोबत असल्याचे सांगितले.
राहुल शेवाळे, दक्षिण-मध्य मुंबई
- आता कुठे : मुंबईत आहेत.
ते आपल्या मतदार संघात शिवसैनिकांसोबत असून, उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे त्यांच्यावतीने सांगण्यात आले.
राजन विचारे, ठाणे
- आता कुठे : खासदार राजन विचारे ठाण्यातील आपल्या घरीच असून,
शिवसेनेतील बंडाबाबत बोलायचे नसल्याने त्यांनी फोन स्वीकारण्याचे टाळले.
राजेंद्र गावित, पालघर
- आता कुठे : सध्या पालघर येथील घरीच.
मी शिवसेनेसोबतच आहे, असे गावित यांनी स्पष्ट केले.
विनायक राऊत, रत्नागिरी-सिंधुदुर्ग
- आता कुठे : मुंबईत आहेत.
आपण निष्ठावान शिवसैनिक असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
यांना सोडून जाणार नाही. गेलेले आमदार परत शिवसेनेसोबत येतील, असा विश्वासही राऊत यांनी बोलून दाखविला.
हेमंत गोडसे, नाशिक
- आता कुठे : नाशिकमध्ये आहेत.
सध्याचे आमदारांचे आकडे पाहता, गोंधळून जाण्यासारखी परिस्थिती असून, पक्षाचे सारे खासदार मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचे खासदार गोडसे यांनी सांगितले.
धैर्यशील माने, हातकणंगले
- आता कुठे : हातकणंगले येथे घरीच आहेत
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
सदाशिव लोखंडे, शिर्डी
आता कुठे : मतदारसंघामध्ये दाखल झाले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वासोबत मी ठामपणे उभा आहे. ते गेले दोन दिवस मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या वेगवेगळ्या बैठकांना उपस्थित होते.
भावना गवळी, यवतमाळ-वाशिम
आता कुठे : फोन ‘नॉट रिचेबल’.
एकनाथ शिंदे यांनी मांडलेली भूमिका समजून घ्या, असे आवाहन गवळी यांनी बुधवारी मुख्यमंत्री ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात केले आहे.
प्रतापराव जाधव, बुलडाणा
- आता कुठे : नवी दिल्ली येथे आहेत.
आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत; परंतु, भाजप व शिवसेनेने एकत्र येणे आवश्यक आहे. भाजपसोबत जाणे कधीही चांगले, असे त्यांनी सांगितले.
कृपाल तुमाने, रामटेक
आता कुठे : नवी दिल्ली येथे आहेत.
उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे यांपैकी कुणासोबत आहात, याबाबत उत्तर देण्याचे तुमाने यांनी टाळले.
हेमंत पाटील, हिंगोली
- आता कुठे : मुंबईत आहेत.
माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला शिवसेनेने बळ दिले आहे. त्यामुळे मी कदापिही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी प्रतारणा करू शकत नाही. पक्ष सोडण्याचा विचारही कधी मनात येणार नाही, असे ते म्हणाले.
संजय जाधव, परभणी
आता कुठे : गुरुवारी मुंबईत होते.
कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना शिवसेनेने आतापर्यंत दिलेल्या संधीबद्दल समाधानी आहे. त्यामुळे आपण आजन्म शिवसेनेसोबतच राहणार आहोत. दुसरा कोणताही विचार मनामध्ये येणार नाही, असे ते म्हणाले.
ओमराजे निंबाळकर, उस्मानाबाद
- आता कुठे : मुंबईत आहेत.
आपले इमान हे कायम ‘मातोश्री’च्या चरणीच आहे. ठाकरे परिवार
कोणत्याही प्रसंगात असो आपण आजही त्यांच्याबाजूने आहोत. भविष्यातही ठामपणे राहू, असे ते म्हणाले.
श्रीरंग बारणे, मावळ
- आता कुठे : पिंपरी-चिंचवडमधील घरीच.
मोबाइल गुरुवारी काहीवेळ नॉट रिचेबल होता. त्यावरून ते गुवाहाटीला गेल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली. सायंकाळी त्यांचा मोबाइल सुरू झाला. मी शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे, अशी प्रतिक्रिया दिली.
संजय मंडलिक, कोल्हापूर
- आता कुठे : कोल्हापुरातच आहेत.
उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी मी ठामपणे उभा आहे, असे सांगत त्यांनी ठाकरे यांच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून ‘सदाशिवसेना’ कायम तुमच्या पाठीशी असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या वडिलांचे नाव सदाशिवराव आहे.