Gajanan Kirtikar: नाव ठाकरे सरकारचं, पण खरा फायदा घेतंय 'पवार सरकार'; शिवसेना खासदाराचं वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 09:02 PM2022-03-21T21:02:43+5:302022-03-21T21:04:14+5:30
"याला ठाकरे सरकार म्हटले जाते, पण खरा फायदा तर पवार सरकारलाच मिळत आहे..."
महाराष्ट्रात भलेही उद्धव ठाकरे सरकारचे नाव आहे, पण खरा फायदा 'पवार सरकार'लाच होत आहे, असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी केले आहे. रत्नागिरीत बोलताना, आघाडी सरकारमधील भागीदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधत कीर्तिकर म्हणाले, याला ठाकरे सरकार म्हटले जाते, पण खरा फायदा तर पवार सरकारलाच मिळत आहे.
एक प्रश्नाला उत्तर देत कीर्तिकर म्हणाले, 'माझी रत्नागिरीतून कुठलीही निवडणूक लढण्याची इच्छा नाही. मुंबईमध्ये आम्हाला सीएम आणि नगर विकास फंडातून भरपूर निधी मिळतो. ग्रामीण भागांतील लोकप्रतिनिधींना गावांत बरीच कामे करावी लागतात. मी माझ्याकडून शक्य तेवढी मदत करत असतो.'
कीर्तीकर म्हणाले, सरकारकडून निधी मिळविण्यासाठी मोठी स्पर्धा आहे. मी येथे राष्ट्रवादीचे नाव घेईन. या सरकारला आपण उद्धव ठाकरे सरकार म्हणून ओळखतो, पण खरा फायदा पवार सरकारला होत आहे. यामुळे सरकारमध्ये तणावाचे वातावरण निर्माण होत आहे. रत्नागिरीतील दापोली येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात कीर्तिकर बोलत होते. यावेळी, आमदार योगेश कदम आणि शिवसेनेचे इतर स्थानीय नेतेही उपस्थित होते.
खरे तर, राज्यातील महाविकास अघाडी सरकारमध्ये सहभागी असलेले काँग्रेस आणि शिवसेनेचे नेते नेहमीच विकासासाठी कम फंड मिळत असल्याची तक्रार करत असतात. एवढेच नाही, तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला होता. या आघाडी सरकारमध्ये तीन पक्ष सहभागी आहेत, मात्र खरा फायदा राष्ट्रवादीलाच होत आहे. काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांपेक्षा त्यांच्या नेत्यांना अधिक निधी दिला जातो, असे फडणवीस यांनी म्हटले होते.