उद्धव ठाकरेंचे 'ते' उद्गार कधीच विसरू शकत नाही; खासदार प्रियंका चतुर्वेदींचे डोळे पाणावले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 11:54 AM2021-08-28T11:54:58+5:302021-08-28T11:57:16+5:30
शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी पक्षप्रवेशाची आठवण सांगताना भावुक
मुंबई: शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे किती शांत, संयमी आणि निश्चयी आहेत ते आज आपण सगळे पाहत आहोत. मुख्यमंत्री म्हणून ते अतिशय उत्तम काम करत आहेत. यासोबतच ते भावनाप्रधान आहेत. मी शिवसेनेत प्रवेश केला, त्यावेळी त्यांनी काढलेले उद्गार मी कधीही विसरू शकत नाही, असं म्हणत खासदार प्रियंका चतुर्वेदींनी उद्धव ठाकरेंसोबतची आठवण सांगितली. लोकमतचे वरिष्ठ पत्रकार अतुल कुलकर्णी यांच्यासोबतच्या गप्पांमध्ये चतुर्वेदींनी त्यांचा आतापर्यंतचा प्रवास उलगडला.
काँग्रेसला रामराम करत सव्वा वर्षांपूर्वी प्रियंका चतुर्वेदी यांनी शिवबंधन हाती बांधलं. त्या पक्षप्रवेशाची आठवण आजही मनात ताजी असल्याचं चतुर्वेदींनी सांगितलं. 'मला तो दिवस, तो क्षण आजही आठवतो. आज माझ्यासाठी एक बहिण आलीय, असं त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले होते. तो क्षण भावुक करणारा होता. कारण मला पक्षानं पद दिलंय, ते राजकीय, प्रोफेशनल स्वरुपाचं आहे. पण बहिण हे नातं वैयक्तिक स्वरुपाचं आहे. जे सदैव कायम राहणारं आहे,' असं चतुर्वैदी म्हणाल्या. ही आठवण सांगताना त्यांचे डोळे भरून आले.
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर काही दिवसांतच भावुक करणारा आणखी एक क्षण मी अनुभवला. उद्धव ठाकरेंनी मला बोलावून तुम्हाला दिल्लीला पाठवणार असल्याचं, राज्यसभेची खासदारकी दिली जाणार असल्याचं सांगितलं. तो क्षण माझ्यासाठी महत्त्वाचा होता, असं प्रियंका यांनी सांगितलं. तुम्ही दिल्लीत महाराष्ट्राचे प्रश्न, समस्या मांडा. महाराष्ट्राचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवा, अशी सूचना पक्षप्रमुखांनी केली. त्यांच्या विश्वासाला पात्र ठरण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करतेय, असं चतुर्वेदी म्हणाल्या.
तुम्ही खासदारकीसाठी काँग्रेसला रामराम केल्याचं विरोधक म्हणतात, त्यावर काय सांगाल, असा प्रश्न चतुर्वेदींना विचारण्यात आला. त्यावर असा विचार संकुचित स्वरुपाचा आहे. हा विचार अतिशय मर्यादित नजरेतून पाहणारेच करू शकतात. राज्याचा आवाज दिल्लीत पोहोचवण्याची क्षमता माझ्यात असल्याचं पक्षाला जाणवलं. त्यामुळे त्यांनी मला इतकी संधी दिली. पक्षानं खूप मोठी जबाबदारी खांद्यावर टाकली आहे. ती पार पाडण्याचा प्रयत्न माझ्याकडून सुरू आहे, असं चतुर्वेदींनी सांगितलं.