Corona Vaccine: मोफत लसीकरणासाठी BMC च्या एफडी मोडा; शिवसेना खासदाराचे उद्धव ठाकरेंना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 04:52 PM2021-04-27T16:52:32+5:302021-04-27T16:58:07+5:30
Corona Vaccine: शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.
मुंबई: देशातील कोरोनाची परिस्थिती गंभीर, भयंकर आणि भयावह होत चालली आहे. कोरोनाच्या नियंत्रणासाठी कोरोना लसीकरणावर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. देशात कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा १ मेपासून सुरू होत असून, १८ वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. अनेक राज्यांनी कोरोना लस मोफत देण्याचे जाहीर केले आहे. महाराष्ट्र सरकारनेही याबाबतची घोषणा केली असली, तरी याबाबत एक वाक्यता नसल्याचे दिसून येत आहे. महाविकास आघाडीमध्ये यावरून नाराजी आहे. राज्यातील नागरिकांचे मोफत कोरोना लसीकरण करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेची आर्थिक मदत घ्यावी, असे शिवसेना खासदाराने म्हटले आहे. (shiv sena mp rahul shewale writes to cm uddhav thackeray about corona free vaccination)
येत्या १ मे पासून महाराष्ट्रातील १८ वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरण मोहिमेला सुरुवात केली जाणार आहे. राज्यातील नागरिकांना मोफत लस देण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. त्यासाठी सुमारे साडेपाच हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. लॉकडाऊनमुळे हा खर्च सरकारला परवडणारा नाही, असे म्हटले जात आहे. या संदर्भात शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. यासाठी राज्य सरकारने मुंबई महापालिकेची मदत घ्यावी, असे शेवाळे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
आताची स्थिती नॅशनल इमरजन्सी नाही का? लसींच्या किमतीवरुन सुप्रीम कोर्टाने केंद्राला फटकारले
मुंबई महाराष्ट्राची राजधानी व देशाची आर्थिक राजधानी
गेल्या वर्षभरापासून राज्य सरकार कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यामुळे राज्य सरकारचा निधी देखील मोठ्या प्रमाणात खर्च झाला आहे. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी व देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईने संकटाच्या काळात वेळोवेळी महाराष्ट्राला व देशाला मदत केली आहे. देशातील सगळ्यात मोठी महानगरपालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या सुमारे ७९ हजार कोटींच्या ठेवी विविध बँकांमध्ये ठेवलेल्या आहेत. राज्य सरकारने मोफत लसीकरणासाठी मुंबई महानगरपालिकेच्या या निधीचा वापर करावा. तसेच राज्य सरकारने पालिकेचा हा निधी काही वर्षांनी परत द्यावा, असा एक उपाय शेवाळे यांनी या पत्राच्या माध्यमातून सूचवला आहे.
कोरोनाचा कहर! भारताच्या मदतीला अमेरिकेच्या कंपन्या; ४० सीईओंच्या टास्क फोर्सची स्थापना
पाच लाख लसीकरणाचा टप्पा पूर्ण
महाराष्ट्राने मंगळवारी दीड कोटी लसीकरण पूर्ण केले असून, एवढ्या मोठ्या संख्येने लसीकरण करणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य ठरले आहे. काल दिवसभरात ५ लाख ३४ हजार नागरिकांना लस देऊन राज्याने विक्रमी नोंद केली आहे, असे ट्विट राजेश टोपे यांनी केले आहे.
कोरोनाचे थैमान! आता घरातही मास्क घालण्याची वेळ: केंद्र सरकारचा गंभीर इशारा
दरम्यान, ३ एप्रिल रोजी ४ लाख ६२ हजार ७३५ नागरिकांचे लसीकरण करून महाराष्ट्राने राष्ट्रीय विक्रम नोंदविला होता. लसीकरणात महाराष्ट्र देशात सातत्याने अग्रस्थानी आहे. आतापर्यंत १ कोटी ४३ लाख ४२ हजार ७१६ नागरिकांचे लसीकरण झाले.