Maharashtra Political Crisis: “उद्धव ठाकरेंनी मन मोठं करुन द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा”; सेना खासदाराची विनंती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2022 12:43 PM2022-07-07T12:43:49+5:302022-07-07T12:44:38+5:30
Maharashtra Political Crisis: द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंवर पक्षातूनच दबाव वाढत चालला असून, राहुल शेवाळेंनंतर शिवसेनेच्या आणखी एका खासदाराने विनंती केली आहे.
मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात राजकीय संघर्ष सुरू असताना, दुसरीकडे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची (Presidential Election 2022) रणधुमाळी सुरू आहे. १८ जुलै रोजी होणाऱ्या देशाच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी एनडीएने आदिवासी नेतृत्व म्हणून द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली आहे. राहुल शेवाळे यांच्यानंतर आणखी एका खासदाराने द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना विनंती केल्याचे सांगितले जात आहे.
शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटानेही द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे. शिंदे गटाच्या या घोषणेनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. या निवडणुकीत विरोधकांनी यशवंत सिन्हा यांना उमेदवारी दिली आहे. अशा परिस्थितीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह महाराष्ट्रात सरकारमध्ये सहभागी असलेली उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यशवंत सिन्हा की द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देणार याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. यातच आता खासदार राहुल शेवाळे यांच्यानंतर राजेंद्र गावित यांनी उद्धव ठाकरे यांना द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याविषयी विनंती केली आहे.
आदिवासी समाज उद्धव ठाकरेंचे स्वागत करेल
राजकीय दृष्ट्या काही असले तरी पहिल्यांदाच आदिवासी महिलेला राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी मिळालेली आहे. उद्धव ठाकरेंनी मन मोठे करुन त्यांना पाठिंबा द्यावा. त्यांना पाठिंबा दिल्यास संपूर्ण आदिवासी समाज उद्धव ठाकरेंचे स्वागत करेल. मला विश्वास आहे की ते याबाबत निर्णय घेतील, असे राजेंद्र गावित यांनी म्हटले आहे.
दरम्यान, शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर करण्याची विनंती केली होती. ज्याप्रमाणे बाळासाहेब ठाकरेंनी प्रतिभा पाटील आणि प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा दिला होता, त्याप्रमाणे राजकीय मतभेदांव्यतिरिक्त द्रौपदी मुर्मू यांना पक्षाच्या खासदार म्हणून मत द्या, असे राहुल शेवाळे यांनी म्हटले होते.