...म्हणून शाबासकीची थाप पाठीवर मारली; संजय राऊतांची एकनाथ शिंदेंवर खोचक टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 11:21 AM2022-12-12T11:21:03+5:302022-12-12T11:21:17+5:30
जिथे बाळासाहेब ठाकरे त्यांचे चिरंजीव तिथे शिवसेना, आम्ही गट मानत नाही असंही संजय राऊतांनी म्हटलं.
नवी दिल्ली - बाळासाहेब ठाकरेंचा फोटो चौथ्या स्थानी ठेवला हे लोकांनी निदर्शनास आणले. सगळ्या गोष्टी तुम्ही सहन करताय. महाराष्ट्र स्वाभिमान, अस्मिता शौर्यासाठी प्रसिद्ध आहे. त्या महाराष्ट्रात दुर्दैवाने काय झालंय? कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जे काही विधान केले त्यापुढे शेपूट घातलंय. सीमावाद सुनावणी सुरू असताना महाराष्ट्रातील गावांवर बोम्मई यांनी हक्क सांगून विषय उकरून काढला. मराठी माणसांवर अत्याचार कशाला? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यावर गप्प आहेत अशा शब्दात शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे.
संजय राऊत म्हणाले की, शाब्बास शिवसेना फोडल्याबद्दल एकनाथ शिंदेंच्या पाठीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शाबासकीची थाप मारली. औरंगजेब, अफजल खानाला जमलं नाही, जे आम्हाला जमलं नाही तो पाठीत खंजीर खुपसून तुम्ही दाखवला त्यासाठी ही थाप मारली असावी असं लोकांना वाटतंय. बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेताना भावूक होणे हे ढोंग आहे. केवळ पंतप्रधानांनी बाळासाहेबांचा उल्लेख केला. पण मान-सन्मान मिळेल असं वर्तवणूक कुणी केले नाही असं त्यांनी सांगितले.
तर जिथे बाळासाहेब ठाकरे त्यांचे चिरंजीव तिथे शिवसेना. निवडणूक आयोगाच्या अधिकारावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. शिवसेना आणि शिंदे गटात सुनावणी सुरू आहे. जरी या प्रकरणात विशिष्ट बाजूने निर्णय घेण्याचा दबाव असला तरी न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे. बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्राची पुण्याई वाया जाणार नाही. राज्यातील साडे अकरा कोटी जनता डोळ्यात प्राण आणून या निर्णयाकडे पाहतायेत. शिवसेना, धनुष्यबाण हे बाळासाहेब ठाकरेंच्या उद्धव ठाकरे शिवसेनेकडे आहे. आम्हाला गटतट माहित नाही. पुण्याई कुणाला पळवता येणार नाही असा टोलाही संजय राऊतांनी शिंदे गटाला लगावला.
महाराष्ट्राचे २ तारे, छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे
दरम्यान, महाराष्ट्राला ११ तारे राज्याला देतोय असं पंतप्रधान म्हणाले. त्यातील पहिले २ तारे छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे. या दोन्ही ताऱ्यांचा अवमान आणि अपमान झाला. छत्रपती शिवराय प्रखर सूर्य. त्यावर थुंकणारे व्यासपीठावर होते. राज्याचे मुख्यमंत्री पंतप्रधानांना विचारतील. महाराष्ट्राचा अवमान करणारे व्यासपीठावर असताना मी इथं का बसू? असं विचारायला हवं होते. परंतु पंतप्रधानांनी जी थाप पाठीवर मारली ती शाब्बास शिवसेना फोडल्याबद्दल होती. बाळासाहेब ठाकरेंना चौथ्या स्थानावर ठेवणं हे गंभीर आहे. तुम्ही हे सहन करताय? असा सवाल संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना विचारला.