राज यांच्या भाषणातून एक गोष्ट कळली; राऊतांनी एकाच वाक्यात 'अक्कल'(दाढ) काढली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2022 11:08 AM2022-04-03T11:08:08+5:302022-04-03T11:10:34+5:30
शिवसेना खासदार संजय राऊतांचा मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर निशाणा
मुंबई: गुढीपाडवा मेळाव्यातून शिवसेनेवर बरसलेल्या मनसे प्रमुख राज ठाकरेंना आता शिवसेनेनं जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. मशिदीच्या आणि तुमच्या भोंग्याचं काय करायचे ते सरकार बघेल. नुसती टीका करून काय होणार? अशानं हाती असलेलंदेखील गमवाल, असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. राज यांच्या भाषणाचा भोंगा भाजपचा होता, अशी टीका राऊतांनी केली. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
काल मुंबईत दिवसभरात मुख्यमंत्र्यांनी अनेक लोकोपयोगी प्रकल्पांची उद्घाटनं केली. मेट्रोचे दोन टप्पे सुरू केले. मराठी भाषा भवनाच्या कामाचा शुभारंभ केला. मात्र त्याबद्दल राज यांनी त्यांच्या भाषणात चकार शब्द काढला नाही. जातीयवादासाठी त्यांनी शरद पवारांना जबाबदार धरलं. त्याच पवारांच्या चरणांजवळ राज जात होते. सल्लामसलत करत होते, याची आठवण राऊत यांनी करून दिली.
कालच्या सभेतून एक गोष्ट कळली, ती म्हणजे अक्कलदाढ उशिरा येते, अशा शब्दांत राऊत यांनी राज यांना सणसणीत टोला हाणला. शिवतीर्थावरच्या टाळ्या स्पॉन्सर्ड होत्या. शिवाजी पार्कवर भाजपचा भोंगा होता. भाजप त्यांची मळमळ दुसऱ्यांच्या भोंग्यातून बाहेर काढत आहे ते आता स्पष्टपणे दिसू लागलं आहे, अशी टीका राऊतांनी केली.
राज यांच्या भाषणावर काय म्हणाले पवार?
राज यांच्या भूमिकेत सातत्य नसतं. आधी त्यांनी नरेंद्र मोदींच्या कामाचं तोंडभरुन कौतुक केलं. तेव्हा मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर त्यांनी मोदींच्या कारभारावर सडकून टीका केली. आता ते पुन्हा मोदींचं कौतुक करत आहेत. भाजपच्या जवळपास जाणारी भूमिका घेत आहेत. उद्या ते काय करतील, काय म्हणतील, ते मला सांगता येणार नाही, अशा शब्दांत पवारांनी राज यांना लक्ष्य केलं.
राज ठाकरे ३-४ महिने भूमिगत होतात. मग त्यानंतर एखादं लेक्चर देतात. मग पुन्हा ३ ते ४ महिने भूमिगत होतात, अशा शब्दांत पवारांनी राज यांना टोला लगावला. राज यांच्या राजकारणाचं हेच वैशिष्ट आहे, असंही पवार म्हणाले. राज यांनी उत्तर प्रदेशातील योगी सरकारच्या कामाचं कौतुक केलं. राज यांना उत्तर प्रदेशात नेमकं काय दिसलं ते माहीत नाही. योगींच्या कार्यकाळात शेतकऱ्यांना कारखाली चिरडण्यात आलं. शेतकऱ्यांचं आंदोलन वर्षभर चाललं. मात्र त्याकडे तिथल्या सरकारनं लक्ष दिलं नाही, असं पवार म्हणाले.