"...म्हणून फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्या मनाला, बुद्धीला चालना मिळते"
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 01:09 PM2020-07-10T13:09:00+5:302020-07-10T13:11:14+5:30
शिवसेना खासदार संजय राऊत यांची टोलेबाजी; फडणवीस आणि पाटील यांचा समाचार
मुंबई: राज्य कोरोना संकट असतानाही राजकारण जोरात सुरू आहे. शिवसेना खासदार संजय राऊत राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भाजपावर सातत्यानं शरसंधान साधत आहेत. तर त्यांच्यी टीकेला भाजपाकडून प्रत्युत्तर दिलं जात आहे. भाजपावर सतत तोंडसुख घेणाऱ्या संजय राऊत यांनी 'सामना'मध्ये आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, शेतकऱ्यांची कर्जमाफी, कोरोना स्थितीवरही लेखन करावं, असा सल्ला देत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राऊत यांना टोला लगावला. आता राऊत यांनी पाटील यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सामनाचे निष्ठावंत वाचक आहेत. सामना वाचल्यानं ते राजकारणाच्या मुख्य प्रवाहात येत आहेत, असा टोला संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना लगावला. 'विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सामना वाचतात. त्यामुळेच त्यांच्या बुद्धीला आणि मनाला चालना मिळते. सामना वाचत असल्यानं ते मुख्य प्रवाहात येत आहेत. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन,' अशी टोलेबाजी राऊत यांनी केली. सामनामध्ये कोरोनावर लिखाण करण्याची मागणी करणाऱ्या फडणवीस यांना राऊत यांनी उत्तर दिलं. फडणवीस यांनी गेल्या काही महिन्यांमधील सामना नीट वाचवा. त्यांना कोरोनावरील लिखाण वाचायला मिळेल, असं राऊत म्हणाले.
सामनामध्ये उद्यापासून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत प्रसिद्ध होणार आहे. या मुलाखतीचा पहिला प्रोमो राऊत यांनी ट्विटरवर 'एक शरद सगळे गारद' अशा शीर्षकासह शेअर केला. त्यावरून विरोधकांनी केलेल्या टीकेलादेखील राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं. 'शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरेंनी खूप वर्षांपूर्वी मार्मिकमध्ये एक लेख लिहिला होता. दोन शरद, सगळे गारद असं त्याचं शीर्षक होतं. शरद जोशी आणि शरद पवार यांच्यावर तो लेख लिहिण्यात आला होता. तेव्हा विरोधी पक्षनेते बहुधा राजकारणातसुद्धा नव्हते. मात्र आम्ही बाळासाहेबांसोबत काम करत होतो. राजकीय अभ्यासात पाया पक्का असावा लागतो,' असा चिमटा राऊत यांनी फडणवीस यांना काढला.