शिवसेना नेत्यांच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी; संजय राऊत म्हणतात... खणत राहा, खणत राहा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 04:26 PM2021-08-30T16:26:01+5:302021-08-30T16:32:11+5:30

शिवसेना खासदार भावना गवळी, परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मालमत्तांवर ईडीचे छापे

shiv sena mp sanjay raut lashes out modi government after ed raids on party leaders | शिवसेना नेत्यांच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी; संजय राऊत म्हणतात... खणत राहा, खणत राहा!

शिवसेना नेत्यांच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी; संजय राऊत म्हणतात... खणत राहा, खणत राहा!

Next

मुंबई: शिवसेनेच्या खासदार, आमदारांना सक्तवसुली संचलनालयाच्या नोटिसा येत आहेत. त्यांच्या मालमत्तांवर, संस्थांवर छापे पडत आहेत. परिवहन मंत्री अनिल परब यांना कालच ईडीनं नोटीस पाठवली. त्यानंतर आज त्यांच्या मालमत्तांवर छापे पडले. वाशिमच्या खासदार भावना गवळी यांच्या संस्थांवरही ईडीनं धाडी टाकल्या. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि भाजपला लक्ष्य केलं आहे. खणत राहा, खणत राहा, असा सल्ला त्यांनी केंद्राला दिला आहे.

शिवसेना खासदार भावना गवळींच्या संस्थांवर आज ईडीनं छापे टाकले. त्याआधी काल अनिल परब यांना ईडीनं नोटीस पाठवली. यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. शिवसेना आणि महाविकास आघाडीतल्या महत्त्वाच्या नेत्यांविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाया सुरू आहेत. केंद्रानं चौकशी कराव्यात, यंत्रणांच्या मदतीनं खणत राहावं. पण तुम्ही खणलेल्या खड्ड्यात एके दिवशी तुम्हीदेखील पडू शकता, असं राऊत म्हणाले.

ईडीची नोटीस आलेल्या अनिल परब यांनी थोड्याच वेळापूर्वी संजय राऊतांची भेट घेतली. त्यानंतर राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. 'अनिल परब माझे सहकारी आहेत. ते नेहमीच मला भेटतात. त्यामुळे या भेटीत विशेष असं काही नाही. कर नाही, त्याला डर कशाला? शिवसेनेला टार्गेट करण्यात येतेय ही गोष्ट सगळ्यांना माहीत आहे. मात्र याचा तसूभरही परिणाम सरकारवर होणार नाही,' असं राऊतांनी सांगितलं.

केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांनी आमचं मनोधैर्य खचणार नाही. उलट ते आणखी मजबूत होईल. ही कायदेशीर लढाई आहे आणि आम्ही ती त्याच मार्गानं लढू. अनिल परब स्वत: वकीलआहेत. त्यांना कायद्याचं उत्तम ज्ञान आहे. त्यामुळे काय करायचं हे त्यांना माहीत आहे. सूडाच्या भावनेतून सध्या बिनबुडाचं राजकारण सुरू आहे. सगळ्यांचे दिवस येतात. दिल्लीत आमचेही दिवस येतील,' असं राऊत म्हणाले. ईडी आणि भाजपची हातमिळवणी आहे. या हातमिळवणीची चौकशी गरजेची असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.

Web Title: shiv sena mp sanjay raut lashes out modi government after ed raids on party leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.