Maharashtra Political Crisis: “आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद, महाराष्ट्र शिवसेनामय झालेला दिसेल”: संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 12:09 PM2022-07-22T12:09:20+5:302022-07-22T12:10:12+5:30
Maharashtra Political Crisis: आदित्य ठाकरे जिथे जातात तिथे तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. आम्ही शिवसेनेसोबतच राहू, असे आश्वासन शिवसैनिक देत आहेत, असे संजय राऊत म्हणाले.
Maharashtra Political Crisis:शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अभूतपूर्व बंडखोरीनंतर पक्षाला मोठेच खिंडार पडल्याचे पाहायला मिळत आहे. संपूर्ण राज्यातून शिंदे गटाला पाठिंबा वाढत आहे. शिवसेनेला पडलेले भगदाड सावरण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आता कंबर कसली असून, आदित्य ठाकरेही (Aaditya Thackeray) सक्रीय झाले आहेत. मुंबईत काढलेल्या निष्ठा यात्रेनंतर आता आदित्य ठाकरे युवासैनिकांशी शिवसंवादच्या माध्यमातून संवाद साधत आहेत. आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य केले आहे. आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद, महाराष्ट्र शिवसेनामय झालेला दिसेल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
आदित्य ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांना ठाण्यात प्रचंड प्रतिसाद मिलाला. भिवंडी, कर्जतमध्येही त्यांचे जल्लोषात स्वागत झाले. जिकडे जातात तिकडे त्यांना तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. आम्ही शिवसेनेच्या सोबतच राहू, असे आश्वासन शिवसैनिक देत आहेत. घोषणा देत आहेत. भविष्यातही महाराष्ट्राचे वातावरण असेच शिवसेनामय झाल्याचे दिसेल, असे संजय राऊत म्हणाले.
शिवसेनेचाही खारीचा वाटा आहे
देशाच्या राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मू विराजमान झाल्या आहेत. त्यांना देशभरातून मोठे मतदान झाले. त्यात शिवसेनेचाही खारीचा वाटा आहे. देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती होण्याचा मान त्यांना मिळाला. त्या संविधानाच्या चौकीदार आहेत. त्यांनी संविधानाचे रक्षण करावे. दलित आदिवासींना न्याय देण्याची त्यांच्यावर जबाबदारी आहे. ही जबाबदारी त्यांनी पार पाडावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, केंद्रीय तपास यंत्रणा कुणाच्या दबावाखाली काम करतात ते सर्वांना माहीत आहे. आम्ही सर्व विरोधी पक्ष देश हितासाठी प्रश्न विचारत आहोत. सातत्याने अन्यायाविरोधात आवाज उठवत आहोत. पण आमचा आवाज दाबण्यासाठी चौकशी होत आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी किंवा मी कोणी असो जो सवाल विचारेल. त्याला धमकावले जातेय. दबाव आणला जातोय, तुरुंगात टाकले जाण्याची धमकी दिली जातेय. पण आम्ही या सर्वासाठी तयार आहोत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.