संजय राऊतांनी सांगितला 'फ्री काश्मीर'चा अर्थ; भाजपाला चोख प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2020 10:23 AM2020-01-07T10:23:54+5:302020-01-07T10:31:10+5:30
सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन अमित शहांचा समाचार
मुंबई: जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील हिंसाचाराच्या निषेधार्थ देशभरात विद्यार्थ्यांनी आंदोलनं सुरू केली आहेत. त्यापैकी गेटवे ऑफि इंडियाजवळील आंदोलन एका पोस्टरमुळे चर्चेत आलं आहे. गेटवे ऑफ इंडियाजवळ आंदोलन करणाऱ्या एका तरुणीनं हातात 'फ्री काश्मीर'चं पोस्टर धरलं होतं. त्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. फडणवीस यांनी ट्विटमधून उपस्थित केलेल्या प्रश्नाला राऊत यांनी उत्तर दिलं आहे.
'फ्री काश्मीरचा अर्थ संबंधित व्यक्तीनं सांगितल्याचं मी वर्तमानपत्रात वाचलं. फ्री काश्मीरचा अर्थ काश्मीरची निर्बंधांमधून मुक्तता करा असा होतो. काश्मीरमधील इंटरनेट, मोबाईल सेवा बंद आहे. तिथे आणखीही काही प्रकारचे निर्बंध लागू आहेत. त्या निर्बंधांतून काश्मीरला मुक्त करा, अशी मागणी आंदोलक तरुणी करत असल्याचं माझ्या वाचनात आलं आहे,' असं राऊत पुढे म्हणाले. काश्मीरला भारतापासून मुक्त करा, असं कोणी म्हणत असेल तर ते सहन करणार नाही, असा आक्रमक पवित्रादेखील राऊत यांनी घेतला.
Sanjay Raut,Shiv Sena: I read in newspaper that those who held 'free Kashmir' banner clarified that they want to be free of restrictions on internet services,mobile services and other issues. Also, if anyone talks of freedom of Kashmir from India then it will not be tolerated. pic.twitter.com/Mi03MkQ3JU
— ANI (@ANI) January 7, 2020
जेएनयूमध्ये भ्याड हल्ला करणाऱ्यांचा संजय राऊत यांनी निषेध केला. 'रात्रीच्या अंधारात तोंड लपवून अतिरेकी, चोर, दरोडेखोर येतात. त्यांच्यात इतकी हिंमत होती तर तोंड झाकून हल्ला का केला?,' असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा खरपूस समाचार घेतला. सुधारित नागरिकत्व कायद्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी शहा सध्या घरोघरी जाऊन पत्रकं वाटत आहेत. देशाच्या गृहमंत्र्यांना हे शोभत नाही. घराघरात जाऊन पत्रकं वाटणं हे गृहमंत्र्यांचं काम नव्हे, असा टोला त्यांनी लगावला.