VIDEO: एक शरद; सगळे गारद! संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीचा टीझर आला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 08:51 AM2020-07-08T08:51:45+5:302020-07-08T09:10:29+5:30
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडून शरद पवारांच्या मुलाखतीचा टीझर ट्विट
मुंबई: शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची घेतलेली मुलाखत शनिवारपासून पाहायला मिळणार आहे. तीन भागांमधील या मुलाखतीचा टीझर संजय राऊत यांनी ट्विट केला आहे. यामध्ये शरद पवार यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे. शरद पवार यांची मुलाखत देशाच्या राजकारणात खळबळ माजवेल, असा दावा राऊत यांनी केला आहे. त्यामुळे या मुलाखतीबद्दल अनेकांना उत्सुकता आहे.
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'चे संपादक असलेल्या संजय राऊत यांनी दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी कोरोना, त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावा लागलेला लॉकडाऊन, याबद्दलची मुख्यमंत्र्यांपेक्षा वेगळी असलेली भूमिका अशा विविध प्रश्नांना उत्तरं दिली आहेत. यासोबतच राम मंदिर आंदोलनासारख्या संवेदनशील विषयावरही भाष्य केलं आहे. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात जवळपास महिनाभर सत्तासंघर्ष सुरू होता. त्यात स्वत: शरद पवार किंगमेकर ठरले. त्यावेळी झालेल्या राजकारणावरही पवार यांना प्रश्न विचारण्यात आले आहेत.
एक शरद!
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 8, 2020
सगळे गारद!! pic.twitter.com/SKcFH33o6v
काल पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देताना संजय राऊत यांनी शरद पवारांच्या मुलाखतीची माहिती दिली. यावेळी त्यांनी शरद पवार यांची मुलाखत घेण्यामागील भूमिका स्पष्ट केली. शरद पवारांची मुलाखत ऐतिहासिक ठरेल. अशी मुलाखत होणे नाही, असा दावा राऊत यांनी केला. 'शरद पवार यांची मुलाखत घेण्याचं आधीच ठरलं होतं. शरद पवार हे राज्यातील देशातील प्रमुख नेते आहेत. लोकांनी बघितलेले आणि मी पाहिलेले पवार वेगळे आहेत. त्यांच्याविषयी गैरसमज पसरवण्यात आले, बदनामीकारक विधानं केली गेली. जेव्हा पहाटेचा शपथविधी झाला, तेव्हा लोकांनी पवारांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं. पण मी म्हटलं होतं की, शरद पवार सरकार स्थापन करतील. त्यांनी बसलेली खीळ तोडून सरकार स्थापन केलं,' असं राऊत यांनी म्हटलं होतं.
शरद पवार यांनी मुलाखतीत देशाबद्दलच्या विविध प्रश्नांना स्पर्श केला असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी चीनसोबतच्या तणावाचा विशेष उल्लेख केला. सध्या चीनसोबतचे संबंध विकोपाला गेले आहेत. चिनी सैन्यासोबत झालेल्या झटापटीत आपले २० जवान शहीद झाले. ज्या भागात ही झटापट झाली, तिथे गोळी झाडता येत नाही. हा करार पवार संरक्षणमंत्री असताना झाला होता. अशा अनेक गोष्टींवर पवारांनी भाष्य केलं आहे. पवारांकडे असलेलं माहितीचं भांडार देशातील लोकांपर्यंत पोहोचवणं महत्त्वाचं आहे. आज देशामध्ये त्यांच्या उंचीचा नेता मला दिसत नाही. पन्नासपेक्षा जास्त वर्षांची त्यांची संसदीय कारकीर्द आहे. ते अजिंक्य आहेत, अशा शब्दांत राऊत यांनी पवारांचं कौतुक केलं.
देशाच्या राजकारणात लवकरच खळबळ; शरद पवारांच्या मातोश्रीभेटीनंतर राऊतांची मोठी घोषणा
'मी पाहिलेले पवार वेगळे, त्यांच्याविषयी बदनामीकारक गैरसमज पसरवले गेले'; राऊतांचा खुलासा
"लोक चिडले आहेत; शरद पवार अन् संजय राऊतांच्या मुलाखतीत कोणालाही इंटरेस्ट नाही"
अंतर्विरोध, अंतरपाट नाही; आम्ही वरमाला घातल्यात! धुसफुशीवरून संजय राऊत यांचे स्पष्टीकरण