कोर्टातून बऱ्याच गोष्टी...; भाजपचे संजय नको ते बोलून बसले; राऊतांच्या हाती आयते कोलीत दिले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 12:13 PM2022-04-15T12:13:26+5:302022-04-15T12:14:02+5:30
शिवसेना खासदार संजय राऊतांना भाजप आमदार संजय कुटेंचा फुलटॉस
बुलढाणा: आमच्याविरोधात शासन, प्रशासन, पोलीस यंत्रणा कितीही वापरल्या, तरीही कोर्ट आमच्यासाठी आहे. कोर्टातून आम्हाला काय करायचं ते आम्ही भविष्यात करणार आहोत, असं विधान जळगाव जामोद-शेगावचे आमदार संजय कुटेंनी केलं आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एका ठराविक पक्षाच्या नेत्यांनाच कोर्टाकडून दिलासा मिळाल्याबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यानंतर आता कुटेंनी कोर्टाबद्दल प्रचंड विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
नेमकं काय म्हणाले संजय कुटे?
मागच्या काही दिवसांत शेगाव शहर आणि ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत गुन्हेगारीच्या घटना घडल्या आहेत. यावरून भाजप आमदार संजय कुटेंनी पोलिसांना धारेवर धरलं. पोलिसच कायद्याचा दुरुपयोग करून शांतता बिघडवत असल्याचा आरोप त्यांनी केला. पोलीस यंत्रणा आमच्याविरोधात कितीही वापरली, तरीही कोर्ट आमच्यासाठी आहे. कोर्टात न्याय मिळतो. कोर्टातून आम्हाला काय करायचं ते आम्ही भविष्यात करू. कोर्टातून बऱ्याच गोष्टी आम्हाला करता येतात, असं कुटे म्हणाले.
संजय राऊतांचं जोरदार प्रत्युत्तर
न्यायालयांकडून विशिष्ट पक्ष आणि विशिष्ट विचारसरणीच्या लोकांनाच गेल्या काही दिवसांपासून दिलासा मिळत आहे. हा दिलासा घोटाळा असल्याचं मी आधीच म्हटलं आहे. आता फडणवीसांचे उजवे हात मानले जाणारे आमदार संजय कुटे यांचं विधान त्याचीच पुष्टी करणारं आहे, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले. पोलीस प्रशासनाकडून ज्या गोष्टी करून घेता येत नाहीत, त्या गोष्टी न्यायालयाच्या माध्यमातून केल्या जात आहेत. दिशा सालियनपासून मुंबै बँक, विक्रांत निधी घोटाळ्यापर्यंत हेच दिसून आलं आहे. त्यामुळे न्यायालयात दिलासा देण्यासाठी काही माणसं बसवण्यात आली आहेत का, न्यायव्यवस्थेवर कोणाचा दबाव आहे का, असे प्रश्न राऊतांनी उपस्थित केले.