'हिंदुत्वाचा विचार बाळासाहेबांनी रुजवला, काहींना आता पालवी फुटली'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 03:05 PM2020-01-23T15:05:17+5:302020-01-23T15:05:53+5:30
'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार आहेत'
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पहिले राज्यव्यापी अधिवेशन आज मुंबईत होत आहे. या अधिवेशनात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी हिंदुत्वाच्या दिशेने जाणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. मनसेने पक्षाचा जुना झेंडा बदलून त्याऐवजी राजमुद्रा असलेल्या भगव्या झेंड्याचे अनावरण केले आहे.
दरम्यान, मनसेच्या हिंदुत्वाच्या वाटचालीवर भाष्य करताना शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच प्रखर हिंदुत्वाचा विचार रुजवला आता काही लोकांना पालवी फुटली आहे, असे म्हणत मनसेला अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.
बाळासाहेब ठाकरे कोणत्याही पदावर नव्हते. पण, जगतज्जेत्या अलेक्झांडरप्रमाणे ते वावरले. लोकांना गोळा केले. लढण्याची प्रेरणा दिली. आजही जी शिवसेना आहे, ती त्यांच्याच मार्गावर जात आहे. तसेच, त्यांनी हिंदुत्वाची ज्योत प्रखरपणे पेटविली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यानंतर हिंदुह्दयसम्राट म्हणून बाळासाहेब आहेत, असे संजय राऊत यांनी सांगितले.
याशिवाय, प्रखर हिंदुत्वाचा विचार बाळासाहेबांनी रुजवला. जो विचार अभिप्रेत होता. बाकी सगळं आता ठीक आहे, पालवी फुटली आहे, काही लोकांना ती फुटू द्या. पण, बाळासाहेबांना आणि शिवसेना यांना तोड नाही. म्हणून फक्त 23 जानेवारीला नाही तर महाराष्ट्रत आणि देशात बाळासाहेबांचे स्मरण रोज होत असते, असेही संजय राऊत यांनी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार आहेत, असे पुन्हा एकदा संजय राऊत यांनी म्हटले आहे. राज्य सरकारला शंभर दिवस पूर्ण होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जातील. महाविकास आघाडीतील नेत्यांनीही मुख्यमंत्र्यासोबत अयोध्येला यावे, असे संजय राऊत यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
मनसे महाअधिवेशन : शिवरायांची राजमुद्रा असलेल्या मनसेच्या नव्या ध्वजाचं अनावरण
मनसे महाअधिवेशन : मनसेच्या महाअधिवेशनात अमित ठाकरेंचं लाँचिंग
मनसेचा नवा झेंडा वादाच्या भोवऱ्यात; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मराठा संघटनांनी केली 'ही' मागणी
मनसे महाअधिवेशन : ''मराठी भाषा, अस्मितेसाठी राज ठाकरेंनी 100हून अधिक केसेस अंगावर घेतल्या"