...म्हणून त्यांनी राजकीय बॉसला पत्र लिहिलं; संजय राऊतांचा राज्यपालांवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 10:39 AM2022-12-13T10:39:16+5:302022-12-13T10:39:43+5:30
पुण्यात कडकडीत बंद असेल त्याची दखल केंद्र सरकार, राज्य सरकार आणि राज्यपालांनी घ्यायला हवी असं राऊतांनी म्हटलं.
नवी दिल्ली - जेव्हा पहाटेचा शपथविधी झाला तेव्हा राज्यपाल आणि केंद्रीय गृहमंत्रालयाचा संपर्क जास्त होता. राज्यपाल हे राष्ट्रपतींचे प्रतिनिधी असले तरी ते गृह मंत्रालयाच्या अख्यारित येतात. त्यामुळे राज्यपालांच्या नियुक्तीबाबत गृहमंत्रालय काम करते. त्यांचे राजकीय बॉस गृहमंत्रीच असतात. त्यामुळे घटनात्मक प्रमुख राष्ट्रपतींपेक्षा राजकीय बॉस असलेल्या गृहमंत्र्यांना राज्यपालांनी पत्र लिहिले अशा शब्दात शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींवर निशाणा साधला आहे.
संजय राऊत म्हणाले की, आज पुण्यात बंद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान, कार्य पुणे, रायगडातून पुढे गेले. पुण्यात कडकडीत बंद असेल त्याची दखल केंद्र सरकार, राज्य सरकार आणि राज्यपालांनी घ्यायला हवी. तुम्ही दिलेल्या पत्राचा परिणाम झाला नाही हे पुणेकर दाखवून देतायेत. पुण्याचे लोण राज्यभर पसरत गेले तर संपूर्ण महाराष्ट्र बंद होईल. १७ तारखेला जो मोर्चा आहे. त्यात महाविकास आघाडीचे सगळे पक्ष सहभागी आहेत. आमच्या दैवतांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, फुले-शाहू आंबेडकरांचा अपमान त्याविरोधात हा मोर्चा आहे. त्याची दखल केंद्र सरकारला घ्यावी लागेल असंही त्यांनी केंद्र सरकारला म्हटलं.
राजकारण बाजूला ठेवा, देशाच्या सीमेकडे लक्ष द्या; राऊतांनी केंद्र सरकारला सुनावलं
सीमा प्रश्न इतका गौण आहे का?
महाराष्ट्र-कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भेट रस्त्यावर झाली. ही सीमाप्रश्न सोडवण्याची जागा आहे का? जाता जाता, एअरपोर्ट लॉबीत सहज भेटले म्हणून बोललो. हा गंभीर प्रश्न आहे. सीमाप्रश्न खालच्या दर्जाचा आहे. जाता येता चर्चा होते का? कर्नाटकचे मुख्यमंत्री सातत्याने महाराष्ट्रावर हल्ले करताय. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. जाता जाता सीमाप्रश्नावर बोललो. ज्या प्रश्नावर ६० वर्ष संघर्ष पेटलाय त्यावर २ मिनिटांची चर्चा होते. सरकारच्या प्रसिद्धी विभागाचं आश्चर्य वाटतं असं सांगत राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.