जे शिंदे गटात गेले ते...; शिवसेना खासदार संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 12:25 PM2022-12-16T12:25:45+5:302022-12-16T12:26:19+5:30
२०२४ ला हे सगळे झुंडच्या झुंड आमच्या दारासमोर उभे राहतील. फक्त गळ्यातील उपरणे बदलतील असं संजय राऊतांनी म्हटलं.
मुंबई - खासदार संजय राऊत यांच्यावर शिवसेना उबाठा गटाच्या नाशिक प्रभारीपदाची जबाबदारी आहे. अलीकडेच राऊत यांनी नाशिकचा दौरा केला. या दौऱ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेने ठाकरे गटाला धक्का दिला आहे. नाशिकमधील माजी उपमहापौरासह ११ नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मात्र शिंदे गटात प्रवेश केलेल्यांबाबत संजय राऊतांनी खळबळजनक आरोप केले आहेत.
खासदार संजय राऊत म्हणाले की, जे शिंदे गटात गेलेत ते दलाल आहेत. एकतर त्यांचे जमिनीचे व्यवहार आहेत. २ नंबरचे धंदे आहेत. त्यांच्यावर पोलीस यंत्रणेचा वापर करून दबाव आणून प्रवेश करायला लावतायेत. लालचेपोटी गेलेत. त्यांना निष्ठा, श्रद्धा, विचार नाहीत. जे गेलेले आहेत त्यांचा सगळ्यांचा व्यवसाय दलालीचा आहे. मंत्रालयात जाऊन दलाली करणे, कंत्राटदारी करणे, ज्याचे सरकार येईल त्यांच्याकडे जातात असा आरोप त्यांनी केला आहे.
त्याचसोबत २०२४ ला हे सगळे झुंडच्या झुंड आमच्या दारासमोर उभे राहतील. फक्त गळ्यातील उपरणे बदलतील. ही राजकारणातील पद्धत आहे. दारू, मटका, झुगार व्यवसाय करणारे आहेत. इकडे तिकडे फिरतात. त्यांना कुठल्याही प्रकारची निष्ठा नाही. त्यामुळे ते गेलेल्यांचे दु:खं नाही. अगदी व्यवस्थित त्यांचा तपशील आम्ही देऊ शकतो. ज्यादिवशी हे सरकार पडेल तेव्हा हे सगळे बेवा होतील आणि आमच्या दारात येतील. तेव्हा आम्ही घेणार नाही असं स्पष्टीकरणही संजय राऊतांनी दिले आहे.
नाशिकमध्ये ठाकरे गटाला धक्का
नाशिकमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून या गटातील सुमारे १२ माजी नगरसेवकांनी बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटात प्रवेश केला आहे. यामध्ये नाशिक महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते, माजी उपमहापौर अजय बोरस्ते यांचा प्रामुख्याने समावेश आहे. त्यांच्या बरोबरच सूर्यकांत लवटे, रमेश धोंगडे, सुदाम डेमसे, श्यामकुमार साबळे, चंद्रकांत खाडे, सुवर्णा मटाले, पुनम मोगरे, जयश्री खर्जुल, ज्योती खोले या माजी नगरसेवकांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे.
ठाकरेंना धक्का! संजय राऊतांची पाठ फिरताच १२ नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश