“राज ठाकरेंकडे आम्ही लक्ष देत नाही, मनसे भाड्याने दिलेला पक्ष”; शिवसेनेची बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2022 08:27 PM2022-05-02T20:27:58+5:302022-05-02T20:29:26+5:30
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मेहनतीने महाराष्ट्राचा कारभार पाहत आहेत. अशा नकलाकारांना ते जमणार नाही, अशी टीका शिवसेनेने केलीय.
सिंधुदुर्ग: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी औरंगाबदला घेतलेल्या सभेत पुन्हा एकदा मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा लावून धरला. याशिवाय इतिहासावर भाष्य करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह महाविकास आघाडीवर टीका केली. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसह महाविकास आघाडीतील नेत्यांनी राज ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे. यात शिवसेनाही मागे नाही. राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना, राज ठाकरे यांच्या वक्तव्याकडे आम्ही लक्ष देत नाही. मनसे हा भाड्यावर ठेवलेला पक्ष आहे, अशी बोचरी टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे.
शिवसेना नेते आणि खासदार विनायक राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांच्या सभेतील मुद्द्यांचा समाचार घेतला. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष भाड्यावर ठेवलेला पक्ष असून जेव्हा कोणाला त्याची गरज भासते तेव्हा तो भाड्याने दिला जातो. राज ठाकरेंच्या वक्तव्याकडे आम्ही लक्ष देत नाही. कालची सभा आम्ही ऐकली पण नाही आणि पाहिलीही नाही. असे किती आले आणि किती गेले, शिवसेना आणि महाविकास आघाडीचे सरकार भक्कम राहील, या सरकारला कुणाचाही धोका नाही, असा विश्वास विनायक राऊत यांनी व्यक्त केला आहे.
नकला करून पक्ष चालत नसतो, त्यासाठी मेहनत करावी लागते
नकला करून पक्ष चालत नाही, त्यासाठी मेहनत करावी लागते. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मेहनतीने महाराष्ट्राचा कारभार पाहत आहेत. ती मेहनत अशा नकलाकारांना जमणार नाही. नकला ठीक आहे, करमणूक होते, असा टोला राऊतांनी यावेळी बोलताना लगावला. शिवसेनेला कोणीही कमी लेखू नये, यापूर्वीसुद्धा बऱ्याच जणांचा जन्म झाला आणि अस्तही झाला. मात्र, शिवसेना त्यापेक्षाही अधिक गतीने चालत आहे. शिवसेना संपवण्याची सुपारी कोणी घेत असेल तर ते सांगतील, मात्र शिवसेना जबरदस्त ताकतीनिशी उभी राहील, असे विनायक राऊत यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राज ठाकरे मनसेच्या कार्यकर्त्यांना सांगतील की, हनुमान चालीसा वाचा, मशिदींसमोर जाऊन दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावा. मी जरा फिरून येतो. मशिदींसमोर हनुमान चालीसा लावल्यानंतर काही भांडण आणि तंटे झाले तर तुम्ही तुमचे बघून घ्या, अशी राज ठाकरे यांची भूमिका आहे. मशिदींवरील भोंग्यांचा विषय निवडणुकीपुरता आहे, अशी टीका शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी केली.