Maharashtra Politics: “शिवसैनिकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न कोणी केला तर यापुढे तिथल्या तिथे प्रत्युत्तर दिले जाईल”
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2022 03:25 PM2022-10-19T15:25:05+5:302022-10-19T15:26:30+5:30
Maharashtra News: अशा पद्धतीने तोंड बंद करण्याचे प्रयत्न होत असेल, तर आम्ही घाबरणार नाही, असे विनायक राऊतांनी म्हटले आहे.
Maharashtra Politics: आताच्या घडीला राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. यातच सत्ताधारी भाजप आणि शिंदे गट तसेच शिवसेना यांच्यातील संघर्ष तीव्र होत आहे. नवी मुंबईतील शिवसेना माजी नगरसेवकावर हद्दपारीची कारवाई केली त्याविरोधात आंदोलन करण्यात आले. दुसरीकडे, शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या चिपळूणमधील बंगल्यावर भ्याड हल्ला झाल्याची घटना घडली. यावरून शिवसेना चांगलीच आक्रमक झाली असून, शिवसैनिकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न कोणी केला तर यापुढे तिथल्या तिथे प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी दिला आहे.
भास्कर जाधव यांच्या बंगल्यावरील हल्ल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली असून शिवसैनिकही आक्रमक झाले आहेत. दरम्यान, प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. यातच जाधव यांच्या बंगल्यावर हल्ला झाल्याची घटना घडली. जाधव यांच्या घराच्या आवारात दगड, पेट्रोलच्या बाटल्या व स्टम्प आढळल्याचे सांगितले जात आहे. यानंतर विनायक राऊत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
आम्ही घाबरणार नाही
भास्कर जाधव हल्ले झेलण्यासाठी समर्थ आहेत. मात्र, कोणत्याही परिस्थितीत ते गद्दार आणि भ्रष्टाचाऱ्यांची लत्करे वेशीवर टांगल्याशिवाय गप्प बसणार नाहीत. भास्कर जाधव अथवा शिवसैनिकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर त्याला तिथल्या तिथे प्रत्युत्तर दिले जाईल, असा दम विनायक राऊतांनी भरला आहे. नारायण राणे आणि भ्रष्टाचारी राजकीय नेत्यांविषयीची राजकीय परिस्थिती मांडली म्हणून भास्कर जाधव यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही व्यक्तीस्वातंत्र्य आणि भाषण स्वातंत्र्याची पायमल्ली आहे. शिंदे सरकारकडून आमचे नेते, उपनेते आणि कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. अशा पद्धतीने तोंड बंद करण्याचे प्रयत्न होत असेल, तर आम्ही घाबरणार नाही, असे विनायक राऊतांनी म्हटले आहे.
दरम्यान, भास्कर जाधव यांच्या घराच्या ठिकाणी दोन पोलीस कॉन्स्टेबल कायम बंदोबस्तासाठी ठेवले होते. परंतु रात्री अचानक बंदोबस्त का हटवण्यात आला, कोणाच्या आदेशाने पोलीस बंदोबस्त हटवण्यात आला, पोलिसांवर कोणाचा दबाव आहे, अशा प्रश्नांचा भडीमार करत जाब विचारला. तसेच या हल्ल्यामागे असलेल्यांना तात्काळ ताब्यात घ्या, अन्यथा आंदोलनात्मक पवित्रा घेतला जाईल, शिवसैनिक गप्प बसणार नाहीत, असा इशारा देण्यात आला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"