"महाराष्ट्रात काळू-बाळूचाच तमाशा; एक दाढीवाला अन् दुसरा बिन दाढीवाला..."
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2022 07:11 PM2022-08-21T19:11:56+5:302022-08-21T19:12:30+5:30
आता मोदी पर्व संपलं हे फडणवीसांनी मान्य केले. त्यांचे मनापासून कौतुक. मोदींच्या नावावर मते मिळणार नाही हे कळल्यानंतर आता भाजपा बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर मते मागायला निघालेत असंही खासदार राऊत म्हणाले.
सोलापूर - महाराष्ट्रात सध्या काळू-बाळूचाच तमाशा सुरू आहे. एक दाढीवाला आणि दुसरा बिन दाढीवाला. बिन दाढीवाल्याच्या मनात आलं की खेचला माईक, मग दाढीवाला पडला उताणा. राष्ट्रगीतासाठी कसं उभं राहावं हे ज्याला कळत नाही तो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला. स्व. यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राचा सुवर्ण कळश आणला. दिल्लीकरांशी भांडले. महाराष्ट्र चिरडण्याचा प्रयत्न दिल्लीश्वरांनी कायम केला. २०२२ मध्ये मिळालेला मुख्यमंत्री जन गन मन सुरू असताना सारखा शर्ट खाली खेचत असतो अशा शब्दात शिवसेना खासदार विनायक राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला.
विनायक राऊत म्हणाले की, आपण इतिहासात ऐकलं, वाचलंय अलिबाबा ४० चोर, परंतु वास्तव्यात अलिबाबा, ४० चोर कसे पळतात हे महाराष्ट्रानं पाहिलं. धनुष्यबाणाचा टेकू मिळाला नसता तर शहाजी पाटील आमदार दिसला असता का?. ठाकरेंच्या पायातलं तीर्थ प्यायचं सुद्धा शहाजीबापू पाटील यांची लायकी नाही. शिवसेनेच्या सभेतील गर्दी पाहून दररोजपेक्षा दोन जास्त मारतील. शहाजीबापू पाटील केवळ मिमिक्री करण्यास पुढे गेले. जनाची नाही मनाची लाज असती तर ज्या विद्यार्थ्यांना गटारातून शाळेत जावं लागतं ते दुरुस्त करून द्या असं त्यांनी म्हटलं.
तसेच देवेंद्र फडणवीस हे अत्यंत अभ्यासू माणूस. भाजपा मेळाव्यात फडणवीसांनी सांगून टाकलं. बाळासाहेब ठाकरेंच्या विकासाचं स्वप्न साकार करण्यासाठी निवडून यायचं आहे. त्यामुळे आता मोदी पर्व संपलं हे फडणवीसांनी मान्य केले. त्यांचे मनापासून कौतुक. मोदींच्या नावावर मते मिळणार नाही हे कळल्यानंतर आता भाजपा बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर मते मागायला निघालेत असा टोला विनायक राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला.
दरम्यान, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अजिबात डगमगले नाहीत. या गद्दारांची किव करावीशी वाटते. शिवसेनेशी बेईमानी, गद्दारी करायची होती तर भाजपाच्या झोळीत पडा. त्यांचा आधार घ्या. आमदारकी विकली. १२ जणांनी खासदारकी विकली. परंतु त्या परिस्थिततही ओमराजे निंबाळकर, कैलाश पाटील, नितीन पाटील हे बेईमानांच्या टोळीतून सुटून मातोश्रीवर आले. याच प्रामाणिकपणाने काम करणारे शिवसैनिक आहे. ४० चोर गेल्याने शिवसेनेचा परिवार कमी झाला नाही. व्याधीमुक्त शिवसेना झाली हे बरे झाले असा घणाघात खासदार विनायक राऊतांनी शिंदे गटातील आमदारांवर केला.