शिवसेना, राष्ट्रवादीची मुसंडी
By Admin | Published: March 15, 2017 02:39 AM2017-03-15T02:39:47+5:302017-03-15T02:39:47+5:30
जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापती निवडीकरिता मंगळवारी झालेल्या निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी पाच पंचायत समित्यांवर
जयंत धुळप, अलिबाग
जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापती निवडीकरिता मंगळवारी झालेल्या निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी पाच पंचायत समित्यांवर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे, तर शेतकरी कामगार पक्षाने चार पंचायत समित्यांवर आपला लाल बावटा फडकावला आहे.
पोलादपूर पंचायत समितीमध्ये सभापतीपदाच्या आरक्षणातील उमेदवार नसल्याने हे सभापतीपद रिक्त ठेवावे लागले आहे. मात्र, पोलादपूर पंचायत समितीच्या उपसभापतीपदी काँग्रेसचे शैलेश सलागरे विजयी झाल्याने पोलादपूर पंचायत समितीवर सध्यातरी काँग्रेसची सत्ता आली आहे.
उरणमध्ये सभापतीपदी नरेश घरत, तर उपसभापती वैशाली पाटील हे दोघेही शेकापचे उमेदवार विजयी झाले आहेत. पनवेलमध्ये शेकापच्या कविता पाटील सभापती, तर काँग्रेसचे वसंत काढावळे उपसभापती झाले आहेत. अलिबाग पंचायत समितीवर शेकापने सत्ता अबाधित राखली आहे, येथे शेकापच्या प्रिया पेढवी सभापती, तर प्रकाश पाटील उपसभापतीपदी विराजमान झाले आहेत.
मुरूडमध्ये सेनेच्या नीता घाटवळ सभापती, तर काँग्रेसच्या प्रणिती पाटील उपसभापती झाल्या आहेत. कर्जतमध्ये सेनेने निर्विवाद सत्ता काबीज केली असून, सेनेचे अमर मिसाळ सभापती, तर सुषमा ठाकरे उपसभापतीपदी विराजमान झाले आहेत.खालापूरमध्ये राष्ट्रवादी-काँग्रेस-शेकाप आघाडीच्या श्रद्धा साखरे सभापती, तर विश्वनाथ पाटील उपसभापती झाले आहेत. पाली-सुधागडमध्ये सभापतीपदी साक्षी दिघे (राष्ट्रवादी काँग्रेस), तर उपसभापती उज्ज्वला देसाई (शिवसेना), रोह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने निर्विवाद सत्ता काबीज केली असून, सभापतीपदी मीना चितळकर (राष्ट्रवादी काँग्रेस),तर उपसभापतीपदी विजया पाशीलकर विराजमान झाल्या आहेत.
माणगावमध्ये सभापतीपदी सेनेचे महेंद्र तेटगुरे, तर उपसभापतीपदी माधवी समेळ विराजमान झाल्या आहेत. महाडमध्ये सेनेने वर्चस्व राखले आहे. सभापतीपदी सीताराम कदम, तर उपसभापती शुएब पाचकर निवडून आले आहेत. श्रीवर्धनमध्येही सेनेने वर्चस्व सिद्ध करून सभापती सुप्रिया गोवारी, तर उपसभापती बाबूराव चोरगे यांना विराजमान केले आहे.
तळ्यात राष्ट्रवादीने निर्विवाद वर्चस्व सिद्ध करून सभापतीपदी रवींद्र नटे, तर उपसभापतीपदी गणेश वाघमारे यांना विराजमान केले आहे. पोलादपूरमध्ये सभापतीपदाकरिता नियोजित आरक्षणातील उमेदवार उपलब्धच झाला नसल्याने येथे सभापतीपद रिक्त ठेवावे लागले आहे. मात्र, उपसभापती काँग्रेसचे शैलेश सलागरे विजयी झाल्याने येथे सत्ता काँग्रेसची राहणार आहे. पेणमध्ये शेकापने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. (विशेष प्रतिनिधी)
महाडच्या सभापतीपदी सेनेचे कदम
महाड : शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व असलेल्या महाड पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेचे सीताराम कदम तर उपसभापतीपदी शिवसेनेचे सुहेब पाचकर यांची मंगळवारी बिनविरोध निवड झाली.
सभापती, उपसभापतीपदाची निवड जाहीर होताच शिवसैनिकांनी आतषबाजी करीत सेनेचा जयघोष केला. नायब तहसीलदार महेंद्र बेलदार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी दुपारी २ वा. विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ११ वा. सभापतीपदासाठी कदम व उपसभापतीपदासाठी पाचकर यांचेच अर्ज दाखल झाल्याने निवडीची केवळ औपचारिकता बाकी होती. सभापतीपदासाठी माजी उपसभापती व विद्यमान सभापती दीप्ती फळसकर यांचे पती दत्ता फळसकर व माजी सभापती सदानंद मांडवकर यांची नावे चर्चेत होती. मात्र आ. गोगावले यांनी सीताराम कदम यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. उपसभापतीपदासाठी सुहेब पाचकर यांना संधी देण्यात आली आहे.
खालापूरच्या सभापतीपदी श्रद्धा साखरे
वावोशी : गेल्या २० वर्षांची सेनेची सत्ता मोडीत काढत राष्ट्रवादी-शेकाप-काँग्रेस आघाडीच्या श्रद्धा अंकित साखरे या खालापूरच्या सभापती म्हणून बिनविरोध विराजमान झाल्या, तर उपसभापती म्हणून विश्वनाथ पाटील यांची निवड करण्यात आली.
श्रद्धा साखरे व विश्वनाथ पाटील हे नवे चेहरे राष्ट्रवादी-शेकाप-काँग्रेस आघाडीचे असले, तरी हे दोन्ही राजकीय वारसा असलेले सभापती व उपसभापती आहेत. श्रद्धा साखरे या राष्ट्रवादीचे कर्जत खालापूर विधानसभेचे माजी अध्यक्ष विनायकराव चौधरी यांच्या नात आहेत. तसेच राष्ट्रवादी खालापूर तालुका युवक अध्यक्ष अंकित साखरे यांच्या पत्नी आहेत, तर विश्वनाथ पाटील यांचे वडील शंकर पाटील हे जुने राजकारणी म्हणून परिचित आहेत. शंकर पाटील यांनी माडप ग्रामपंचायतीचे अनेक वर्षे सरपंच म्हणून पद भूषविले आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत विश्वनाथ पाटील हेसुद्धा माडप ग्रामपंचायतीच्या विद्यमान उपसरपंचपदी आहेत. खालापूर पंचायत समितीवरती राष्ट्रवादीची निर्विवाद सत्ता यावी, हे आमदार सुरेश लाड यांचे स्वप्न होते. ते आज पूर्ण झाल्याने कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
निवडणुकीत राष्ट्रवादी-शेकाप-काँग्रेस आघाडीचे पाच, तर शिवसेनेचे तीन सदस्य असल्याने शिवसेनेने या निवडणुकीत भाग न घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडली. राजकीय वारसा लाभलेले उमेदवारांचीच सभापती, उपसभापतीपदी वर्णी लागल्याची चर्चा आहे.
कर्जतमध्ये सभापतीपदी शिवसेनेचे अमर मिसाळ
कर्जत : तालुका पंचायत समितीच्या सभापतीपदाची निवडणूक मंगळवारी पार पडली. त्यामध्ये सभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या अमर मिसाळ यांनी आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या रवींद्र देशमुख यांचा दोन मतांनी पराभव केला, तर उपसभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या सुषमा ठाकरे यांनी आघाडीतील शेतकरी कामगार पक्षाच्या कविता ऐनकर यांचा दोन मतांनी पराभव करीत उपसभापतीपदावर शिक्कामोर्तब केले.
पंचायत समितीच्या निवडणुकीत १२ जागांपैकी सात जागा जिंकून शिवसेनेने आपले बहुमत सिद्ध केले होते. त्यामुळे पंचायत समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच सेनेचे स्वबळावर सभापती आणि उपसभापतीपदी विराजमान होणार हे स्पष्ट झाले होते.
पंचायत समितीच्या सभागृहात पीठासीन अधिकारी, तथा तहसीलदार अविनाश कोष्टी यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक विषयक विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभापतीपदासाठी शिवसेनेच्या वतीने अमर मिसाळ आणि उपसभापती-पदासाठी सुषमा ठाकरे यांनी, तर आघाडीच्या वतीने सभापतीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रवींद्र देशमुख व नरेश मसणे, तसेच उपसभापतीपदासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या कविता ऐनकर आणि जयवंती हिंदोळा यांनी अर्ज दाखल केले होते. आघाडीच्या नरेश मसणे यांनी अर्ज मागे घेतल्याने सभापतीपदासाठी अमर मिसाळ आणि रवींद्र देशमुख यांच्यात लढत झाली.
मिसाळ यांना सात, तर देशमुख यांना पाच मते मिळाली. उपसभापतीपदाच्या निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत जयवंती हिंदोळा यांनी अर्ज मागे घेतल्याने सुषमा ठाकरे आणि कविता ऐनकर यांच्यात निवडणूक झाली.
ठाकरे यांना सात, तर ऐनकर यांना पाच मते मिळाली. त्यामुळे सभापतीपदी अमर मिसाळ व उपसभापतीपदी सुषमा ठाकरे निवडून आल्याचे पीठासीन अधिकारी कोष्टी यांनी जाहीर केले.
माणगावमध्ये सेनेचे महेंद्र तेटगुरे विराजमान
माणगाव : माणगाव पंचायत समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे लोणेरे पंचायत समिती गणातून निवडून आलेले महेंद्र पांडुरंग तेटगुरे तर उपसभापतीपदी माधवी गणेश समेळ या निवडून आल्या.
माणगाव तालुका पंचायत समितीच्या निवडणुकीत पंधरा वर्षांनंतर शिवसेनेचा भगवा फडकला असून आठपैकी पाच जागांवर शिवसेनेचे तर तीन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य निवडून आले. त्यानंतर मंगळवार झालेल्या सभापती व उपसभापतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून सभापतीपदासाठी साई गणातून निवडून आलेले शैलेश बाबूराव भोनकर व उपसभापतीपदासाठी तळाशेत गणातून निवडून आलेल्या अलका सदानंद जाधव यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. निकालानंतर माणगाव बाजारपेठेतून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.