शिवसेना, राष्ट्रवादीची यादी तयार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 04:58 AM2019-12-20T04:58:18+5:302019-12-20T05:02:03+5:30
मंत्रिमंडळ विस्तारासाठी थोरात सोमवारी दिल्लीत : मल्लिकार्जुन खरगेंनी घेतली नागपुरात बैठक
अतुल कुलकर्णी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अधिवेशनानंतर दोन दिवसात होईल असे सांगण्यात येत असले तरी विस्ताराच्या तारखेवरुन तिन्ही पक्षात संभ्रम आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेने आपली यादी तयार असल्याचे काँग्रेसला कळवले आहे. काँग्रेसने त्यांची यादी द्यावी म्हणजे एकत्रित विस्तार करता येईल, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे.
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि खरगे यांची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासमवेत बैठक होणार अशी बातमी होती. मात्र खरगे दुपारपर्यंत विधानभवनातच थांबले. नंतर ते यवतमाळ व अमरावती जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांच्या बैठकीसाठी गेले. तोपर्यंत शरद पवार, उध्दव ठाकरे यांची कर्जमाफीची बैठक सुरू झाली. दुपारी शरद पवार औरंगाबादला गेले. त्यामुळे आम्हाला शरद पवार यांना भेटता आले नाही, असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
दरम्यान, काँग्रेसची यादी येण्यास विलंब लागत असेल तर काँग्रेसने जेवढी नावे निश्चित केली आहेत ती द्यावीत, त्या नावांसह शिवसेना, राष्टÑवादी यांची नावे एकत्र करुन अधिवेशनानंतर लगेच शपथ घ्यावी, असा प्रस्ताव पुढे आला आहे. बाळासाहेब थोरात यांनी यादी निश्चित करण्यासाठी आपल्याला सोमवारी दिल्लीला जावे लागेल असे सांगितले आहे. त्यामुळे सोमवारी शपथविधी होणार नाही हे स्पष्ट झाले आहे. शपथविधी झाला तर मंगळवारी २४ तारखेला होऊ शकतो. २५ तारखेला नाताळाची सुटी असली तरी त्यादिवशी अमावस्या आहे. त्यामुळे त्यादिवशी शपथविधी होऊ नये असे काही नेत्यांना वाटत आहे. त्यामुळे हा विस्तार दोन टप्प्यात होईल असे चित्र आज समोर आले आहे.
काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे आज नागपूर येथे आले होते. त्यांनी विधान भवनात काँग्रेस नेत्यांची बैठक घेतली. लोकमतशी बोलताना ते म्हणाले, आमच्या दिल्लीतील नेत्यांशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल. नावे अंतिम करण्यासाठी फार अडचण येणार नाही असेही ते म्हणाले. बैठकीत आमदारांशी बोलताना खरगे यांनी कोणत्याही परिस्थितीत हे सरकार पडू द्यायचे नाही, आपल्याला एकत्रितपणे काम करायचे आहे. कोण काय बोलते याकडे लक्ष न देता सगळ्यांनी एकत्रितपणे काम करावे असेही सांगितले.
ती वेळ येऊ नये म्हणून...
सरकार पडू द्यायचे नाही अशी भूमिका खरगे यांनी मांडली असली तरी त्याचे वेगळे अर्थ काढले जात आहेत. या सरकार विषयी राहुल गांधी अद्याप साशंक आहेत असे सांगितले जाते. जर दिल्लीतील काँग्रेस नेत्यांची भूमिका वेगळी आली तर काँग्रेसचे ३० ते ३५ आमदार स्वतंत्र गट करतील. तो गट सरकारमध्ये सहभागी होईल, परिणामी त्याचा फटका काँग्रेसला बसेल, शिवाय ज्येष्ठ नेत्यांचे राजकारणही अडचणीत येईल, अशी भीती काँग्रेसला वाटत आहे. तसे झाले तर काँग्रेसचे मोठे नुकसान होईल, त्यामुळे ती वेळ येऊ नये यासाठी खरगे यांनी अशी भूमिका मांडल्याचे एका नेत्याने स्पष्ट केले.