आरोपांची राळ उडवून जनतेच्या प्रश्नांवरुन लक्ष वळविण्याचा शिवसेना-राष्ट्रवादीचा प्रयत्न, केशव उपाध्ये यांचा ठाकरे सरकारवर घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 04:45 PM2022-02-17T16:45:21+5:302022-02-17T16:45:32+5:30
'तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची भेट म्हणजे संजय राऊत यांच्याकडून प्रसार माध्यमांचे लक्ष आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न.'
मुंबई: १०० दिवसांपासून सुरु असलेला एसटी संप, विविध परीक्षांचा घोळ, महिलांवरील वाढते अत्याचार , पुण्यायातील महिलेने शिवसेना उपनेत्याविरुद्ध केलेली बलात्काराची तक्रार अशा अनेक प्रश्नांपासून न पळ काढण्याकरिता शिवसेना व राष्ट्रवादी प्रवक्ते पोरकट आरोपांची राळ उडवत आहेत, असा आरोप प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, पॅनेलिस्ट नितीन दिनकर, समीर गुरव यावेळी उपस्थित होते. तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची भेट म्हणजे संजय राऊत यांच्याकडून प्रसार माध्यमांचे लक्ष आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न असावा, असा टोलाही उपाध्ये यांनी लगावला.
उपाध्ये यांनी सांगितले की, पुण्यात एका महिलेने शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक यांच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार दाखल करू न देण्यासाठी कोणी प्रयत्न केले हे समोर येणे आवश्यक आहे. तसेच कुचिक हे कोणाचे मानलेले भाऊ आहेत हेही जनतेला कळायला हवे.
शिवसेनेच्या नेतृत्वाचाच कब्जा मिळविण्याच्या संजय राऊत यांच्या प्रयत्नांना वेसण घालण्यासाठीच पुन्हा विरोधकांच्या ऐक्याचा प्रयोग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरू केला असून राज्यापुढील समस्यांना सामोरे जाण्याची त्यांची हिंमत नाही हेच यातून स्पष्ट झाले आहे. राऊत केंद्रीय राजकारण स्वतःवर केंद्रीत करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले.
आघाडी सरकारच्या बेजबाबदारपणाचे उदाहरण म्हणजे राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे चिघळलेल्या एसटी संपाविरोधातील आंदोलनास गुन्हा ठरवून ३१ वर्षांपूर्वी निधन झालेले कॉंग्रेस नेते शामराव पेजे यांच्यावरच कारवाई. ठाकरे सरकारने कोकणच्या कुणबी व ओबीसी समाजाच्या श्रद्धेची खिल्ली उडविली आहे. pic.twitter.com/YqITMNhHdi
— Keshav Upadhye (@keshavupadhye) February 17, 2022
मराठा आरक्षणप्रश्नी आंदोलनांची तयारी सुरू झाली आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर ठाकरे सरकारची निष्क्रीयता पुन्हा उघड झाली आहे. ग्रामीण महाराष्ट्रास वेठीला धरणाऱ्या एसटी संपात तोडगा काढण्यातदेखील सरकारला पुरते अपयश आले आहे. राऊत यांनी केलेल्या आरोपांच्या चौकशीस सामोरे जाण्याची तयारी भाजपने दाखविली असतानाही, पत्रकार परिषदा घेऊन राजकारण करण्याच्या शिवसेनेकडे सत्ता असूनही हिंमत नाही हेच सिद्ध झाले आहे.