Shiv Sena: निधी मिळत नाही; शिवसैनिकांच्या तक्रारी, शिवसंपर्क यात्रेचा दिल्लीत घेतला आढावा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 07:10 AM2022-04-06T07:10:20+5:302022-04-06T07:11:07+5:30
Shiv Sena News: विदर्भ व मराठवाडा भागात शिवसेनेचे संघटन मजबूत करण्यासाठी काढण्यात आलेल्या शिवसंपर्क यात्रेदरम्यान अनेक शिवसैनिकांनी निधी मिळत नाही व विकासाची कामे होत नसल्याची तक्रारी केल्या.
नवी दिल्ली : विदर्भ व मराठवाडा भागात शिवसेनेचे संघटन मजबूत करण्यासाठी काढण्यात आलेल्या शिवसंपर्क यात्रेदरम्यान अनेक शिवसैनिकांनी निधी मिळत नाही व विकासाची कामे होत नसल्याची तक्रारी केल्या.
शिवसंपर्क यात्रेत शिवसेनेचे खासदार सामील झाले होते. या शिवसंपर्क यात्रेचा आढावा दिल्लीत घेण्यात आला. यावेळी शिवसेनेचे खासदार उपस्थित होते. यावेळी खासदारांनी महाविकास आघाडीत अनेक विकासकामे होत नसल्याच्या तक्रारी केल्या. तसेच अनेकदा विकास निधी मिळत नसल्याचे खासदारांनी या बैठकीत निदर्शनास आणून दिले.
या बैठकीबद्दल बोलताना लोकसभेतील शिवसेनेचे गटनेते विनायक राऊत म्हणाले की, खासदारांनी या शिवसंपर्क यात्रेचा आढावा सादर केला. विदर्भ व मराठवाडा या भागात शिवसेनेचे संघटन मजबूत करण्यासाठी अनेक सूचना देण्यात आल्या. या सूचनावरून संघटन मजबूत करण्यासाठी उपाययोजना केल्या जातील.
खासदारांच्या तक्रारीबद्दल बोलताना खासदार राऊत म्हणाले की, खासदारांनी निधी मिळत नसल्याच्या तक्रारींमध्ये तथ्य नाही. विकासकामे करताना अनेकदा कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असते. ही केवळ नाराजी खासदारांनी बैठकीत व्यक्त केल्याचे खासदार राऊत म्हणाले.