तुम्ही जरा समजून घ्या! संजय राऊतांनी सांगितला मुख्यमंत्री ठाकरेंच्या 'त्या' विधानाचा नेमका अर्थ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 08:34 PM2021-09-17T20:34:05+5:302021-09-17T20:37:00+5:30
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी रावसाहेब दानवेंना उद्देशून केलेल्या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा उल्लेख भावी सहकारी असा केल्यानंतर राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं. खुद्द दानवे यांच्यासह भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली. शिवसेनेसोबत सत्तेत असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनीदेखील मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर भाष्य केलं. शिवसेना आणि भाजप एकत्र येणार का, अशा चर्चा सुरू असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा नेमका अर्थ सांगितला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर शिवसेना-भाजप युतीची चर्चा रंगली असताना संजय राऊतांनी एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं आहे. 'मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलंय, ते आपण नीट समजून घेण्याची गरज आहे. ते भावी सहकारी असं म्हणाले. याचा अर्थ भाजपमधील काही नेते महाविकास आघाडीत येऊ शकतात. भाजपमधले नेते आमच्याकडे येतील. आम्ही कुठेही जात नाही,' असं म्हणत राऊत यांनी महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे पूर्ण करेल असा विश्वास व्यक्त केला.
अजित पवार लवकरच मोठा धमाका करणार? भाजपला जोरदार धक्का देण्याची तयारी
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे एकाच व्यासपीठावर होते. यावेळी मुख्यमंत्री ठाकरेंनी केलेल्या एका विधानानं उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. 'व्यासपीठावर उपस्थित आजी, माजी आणि भविष्यात एकत्र आलो तर माझे भावी सहकारी...', असं विधान केलं आणि यावेळी मुख्यमंत्र्यांचा रोख भाजपाचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या दिशेनं होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानाची कार्यक्रमात जोरदार चर्चा सुरू झाली.
उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला आजी सहकारी म्हणजेच काँग्रेसचे नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात, माजी सहकारी म्हणून उपस्थित भाजपाचे नेते असा उल्लेख केल्यानंतर भविष्यात एकत्र आलो तर भावी सहकारी असं म्हणत त्यांनी भाजपा नेत्यांकडे पाहिलं. उद्धव ठाकरेंच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आलं आहे.