'शिवसेनेनं मंजुरी दिलेले प्रकल्प आता तेच थांबवताहेत; जनतेला उत्तर द्यावं लागेल!'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2019 05:00 PM2019-12-07T17:00:36+5:302019-12-07T17:02:57+5:30

देवेंद्र फडणवीस सरकारने घेतलेले काही महत्त्वाचे, मोठे निर्णय उद्धव ठाकरे सरकारच्या रडारवर असल्याची चर्चा आहे.

Shiv Sena is now stopping projects approved by their ministers; says radha krishna vikhe patil | 'शिवसेनेनं मंजुरी दिलेले प्रकल्प आता तेच थांबवताहेत; जनतेला उत्तर द्यावं लागेल!'

'शिवसेनेनं मंजुरी दिलेले प्रकल्प आता तेच थांबवताहेत; जनतेला उत्तर द्यावं लागेल!'

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही कामं थांबवण्याचे आदेश दिलेत, तर काही कामांबाबत ते पुनर्विचार करणार आहेत.'प्रकल्पांना स्थगिती देण्याच्या निर्णयाबद्दल शिवसेनेला जनतेला उत्तर द्यावं लागेल!''खातेवाटप कधी करायचं हा सर्वस्वी नव्या सरकारचा अधिकार आहे.'

जळगावः शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही कामं थांबवण्याचे आदेश दिलेत, तर काही कामांबाबत ते पुनर्विचार करणार आहेत. देवेंद्र फडणवीस सरकारने घेतलेले काही महत्त्वाचे, मोठे निर्णय त्यांच्या रडारवर असल्याची चर्चा आहे. त्यावरून, भाजपा नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. 

विधानसभा निवडणुकीत जनतेने आम्हालाच कौल दिला. आम्ही सरकार स्थापन करू शकलो नाही. त्यामुळे आम्हाला जनतेला उत्तर द्यावंच लागेल. त्या संदर्भात योग्य वेळी निर्णय घेतला जाईल, असं विखे-पाटील यांनी सांगितलं. देवेंद्र सरकारनं काही कामांना दिलेली मंजुरी नवं सरकार रोखतंय किंवा रद्द करतंय, याबद्दल विचारलं असता, शिवसेना सत्तेत असताना त्यांनी ज्या प्रकल्पांना मंजुरी दिली होती, त्याच प्रकल्पांना आता ते थांबवत आहेत. याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल, असं त्यांनी नमूद केलं.  

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापालिका, नगरपालिका, नगर परिषदा, जिल्हा परिषदांना दिलेला निधी स्थगित करण्याचा निर्णय नुकताच घेतला. मेट्रो प्रकल्पाच्या आरेतील कारशेडलाही त्यांनी स्थगिती दिली आहे. देवेंद्र फडणवीस सरकारच्या कार्यकाळातील सिंचन प्रकल्पांच्या सुधारित मान्यतांचा फेरआढावा उद्धव ठाकरे घेणार आहेत. काही नेत्यांच्या साखर कारख्यानांना फडणवीस यांनी दिलेली ३१० कोटी रुपयांची बँक हमी महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारने रद्द केली आहे. 

दरम्यान, खातेवाटप कधी करायचं हा सर्वस्वी नव्या सरकारचा अधिकार आहे. आम्हाला खातेवाटपाची आम्हाला घाई नाही. ते ठरवतील कधी करायचं ते, असंही राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले.

भाजपाच्या संघटनात्मक निवडणुकीसंदर्भात उत्तर महाराष्ट्रस्तरीय पाच जिल्ह्यांची बैठक आज जळगावात होत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीबद्दल राजकीय वर्तुळात उत्सुकता होती. कारण, प्रदेश भाजपामधील अंतर्गत कलह सध्या चर्चेत आला आहे आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर टीकास्त्र सोडलंय. ते या बैठकीला जाणार का, तिथे जाऊन काय भूमिका मांडणार, यावरून तर्कवितर्क लढवले जात होते. सुरुवातीला खडसे कुटुंबातील कुणीच बैठकीला न दिसल्यानं आश्चर्य व्यक्त होत होतं. परंतु, नंतर खासदार रक्षा खडसे, रोहिणी खडसे आणि स्वतः नाथा भाऊ तिथे पोहोचले. अर्थात, त्यांच्या जाण्याने वाद शमतो की वाढतो, हे पाहावं लागेल.  

Web Title: Shiv Sena is now stopping projects approved by their ministers; says radha krishna vikhe patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.