मोदी @ ९ पासून मित्र शिंदेंची शिवसेना दूरच; सामावून घेण्याबाबत अद्याप चर्चा नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 07:07 AM2023-05-24T07:07:34+5:302023-05-24T07:07:59+5:30
भाजपच्या मंत्र्यांनी आपापल्या विभागामार्फत हे अभियान यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मात्र त्या बाबत शिवसेनेच्या मंत्री कार्यालयांमध्ये कोणत्याही हालचाली दिसत नाहीत.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला ९ वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल ३० मे पासून राज्यात सुरू होणाऱ्या मोदी @ ९ या अभियानापासून भाजपचा मित्र असलेली शिवसेना अद्याप दूरच आहे. त्यामुळे युतीचे सरकार असूनही केवळ भाजपच्या वतीनेच हे अभियान राबविले जात असल्याचे दिसत आहे.
भाजपच्या मंत्र्यांनी आपापल्या विभागामार्फत हे अभियान यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मात्र त्या बाबत शिवसेनेच्या मंत्री कार्यालयांमध्ये कोणत्याही हालचाली दिसत नाहीत. आम्हाला तशा सूचना आलेल्या नाहीत असे दोन मंत्र्यांकडील पीए, पीएस यांनी सांगितले.
भाजपने हे अभियान यशस्वी करण्यासाठी चंग बांधला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, अभियान समितीचे प्रमुख आ. प्रवीण दरेकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली तयारीला वेग दिला आहे.
भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, देश पातळीवर हे अभियान भाजपच्याच माध्यमातून राबविले जाणार आहे. त्यामुळे मित्र पक्षाला त्यात सामावून घेण्यात आलेले नाही. मोदी सरकारचे महाराष्ट्रासाठीचे भरीव योगदान हीच अभियानाची थीम असेल. दोन्ही पक्षांकडील खात्यांमार्फतची कामे लोकांसमोर जाणार आहेत.
समन्वय समिती अद्याप नाही
जाणकारांच्या मते शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन ११ महिने होत आले तरी दोन पक्षांच्या नेते/मंत्र्यांची समन्वय समिती अद्याप स्थापन झालेली नाही. अशी समिती असती तर मोदी @ ९ हे अभियान संयुक्तपणे राबविता आले असते.
मोदी @ ९ हे अभियान राबविणे व त्यात शिवसेनेचा सहभाग याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.
- शंभूराज देसाई,
मंत्री, उत्पादन शुल्क