शिवसेनेने फक्त 'लिव्ह-इन जोडीदार' बदलले; मनसेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 05:22 PM2022-04-11T17:22:09+5:302022-04-11T17:22:33+5:30
शिवसेनेने भाजपाला सोडले आहे. हिंदुत्व सोडलं नाही. शिवसेनेच्या जन्मापासून कधीही झेंडा, रंग, विचार आणि नेता बदलला नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.
मुंबई – कोल्हापूर पोटनिवडणुकीच्या प्रचारावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचं पाहायला मिळत आहे. कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी शिवसेना, राष्ट्रवादी कार्यकर्ते उतरले आहेत. मात्र हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपाने प्रचारात शिवसेनेविरोधात आक्रमक प्रचार केला आहे. कारण युती काळात ही जागा शिवसेना लढवत होती. मात्र आता महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेस लढवत आहे.
शिवसेनेच्या भगव्याचा रंग बदलला आहे असा आरोप भाजपा नेते सातत्याने करत आहेत. मात्र त्यावर प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरेंनी(CM Uddhav Thackeray) शिवसेनेने भाजपाला सोडले आहे. हिंदुत्व सोडलं नाही. शिवसेनेच्या जन्मापासून कधीही झेंडा, रंग, विचार आणि नेता बदलला नाही. त्याचसोबत देशात बनावट हिंदुह्दयसम्राट बनवण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे असं सांगत मुख्यमंत्री ठाकरेंनी एकाच दगडात भाजपा-मनसेला टोला लगावला होता. मात्र त्यावर मनसेने मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे.
मनसेचे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे म्हणाले की, अगदी खरंय, मुख्यमंत्री महोदय. शिवसेनेने कधीच काही बदललं नाही. फक्त सुरुवातीला आपलं राजकीय अस्तित्व जपण्यासाठी आणि नंतर राजकीय सत्ता हस्तगत करण्यासाठी शिवसेनेने फक्त आपले 'लिव्ह-इन जोडीदार' बदलले! मुस्लिम लीग, काँग्रेसचे विविध गट, प्रजा समाजवादी पक्ष, आरपीआय गट, भाजपा यांच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर आता पुन्हा नवीन लग्न- राष्ट्रवादी, काँग्रेससोबत असा प्रतिटोला लगावला आहे.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत कोल्हापूर उत्तर मतदारसंघात भाजपने काँग्रेसला छुपी मदत केली. तशी छुपी युती आम्ही करीत नाही. शिवसेना समोरून वार करते, पाठीत वार करणारी आमची औलाद नाही. हिंदुत्वाचे पेटंट भाजपनेच घेतले आहे का? अशी रोखठोक विचारणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केली. भाजपने नकली भगव्याचा बुरखा पांघरला असून, तो या निवडणुकीत फाटल्याशिवाय राहणार नाही. आम्ही काँग्रेससोबत गेलो म्हणजे हिंदुत्व सोडलेले नाही. तुम्ही काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्तींसोबत सरकारमध्ये गेला. तेव्हा हिंदुत्व कोठे गेले होते? भाजपने बनावट हिंदुहृदयसम्राट बनवण्याचा प्रयत्न केला; मात्र जनतेने तो झिडकारला असं विधान मुख्यमंत्र्यांनी केले होते.