शिवसेनेला केवळ पवारांचीच भाषा समजते; चंद्रकांत पाटलांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 10:54 AM2020-02-26T10:54:58+5:302020-02-26T10:56:07+5:30
भाजपचे नेते सत्तास्थापनेची स्वप्न दाखवत असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. मात्र शिवसेनेने भाजपचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे विरोधी पक्ष म्हणूनच त्यांच्याविरुद्ध लढा देण्याचा संदेश कार्यकर्त्यांमध्ये पोहचविण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.
मुंबई - जनतेचा विश्वासघात करून सत्तेत आलेल्या महाविकास आघाडीविरुद्ध भारतीय जनता पक्ष प्रबळ विरोधीपक्ष म्हणून संघर्ष करणार असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. तसेच सत्तेत आलेल्या शिवसेनेला केवळ पवारांचीच भाषा कळते, सत्तेसाठी त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधल्या गेल्याची टीका पाटील यांनी मंगळवारी केली.
दोन दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी भाऊ-भाऊ असून कधीही एकत्र येऊ शकतात अस म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांनी शिवसेनाच भाजपचे लक्ष्य राहिल अस स्पष्ट केले आहे. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी त्यांच्या बरोबर जाण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेवर कठोर शब्दांत टीका करताना त्यांना केवळ राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांचीच भाषा समजत असल्याचे म्हटले.
सत्तास्थापनेच्या आशेवर बसलेल्या भाजन नेत्यांना चंद्रकांत पाटील यांनी स्वप्नात राहू नका, असा सल्ला दिला आहे. महाविकास आघाडीचे सरकार कोसळेल आणि शिवसेनेसोबत पुन्हा सत्ता स्थापन करता येईल अशी आशा भाजपच्या काही नेत्यांना आहे. या अनुषंगाने भाजपनेते भाकितही वर्तवित आहेत. मात्र स्वप्नात न रंगता शिवसेनेविरुद्ध आक्रमक विरोधीपक्षाची भूमिका निभावण्याचे आम्ही ठरवल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.
दरम्यान भाजपचे नेते सत्तास्थापनेची स्वप्न दाखवत असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. मात्र शिवसेनेने भाजपचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे विरोधी पक्ष म्हणूनच त्यांच्याविरुद्ध लढा देण्याचा संदेश कार्यकर्त्यांमध्ये पोहचविण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.