नितेश राणेंना विरोध कायम; कणकवलीत भाजप-शिवसेना लढत रंगणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2019 11:40 AM2019-10-08T11:40:15+5:302019-10-08T11:41:35+5:30
राणे यांच्या भाजप प्रवेशाला भाजपमधून काही प्रमाणात विरोध आहे. त्यामुळे हा गट शिवसेनेला मदत करण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत नितेश राणे यांच्यासमोर खडतर आव्हान असले तरी नारायण राणे यांचे मतदार संघातील वजन त्यांच्या विजयासाठी फायदेशीर ठरू शकते.
मुंबई - शिवसेना आणि राणे कुटुंबीयांमध्ये असलेला संघर्ष अद्याप कमी झालेला नाही. नारायण राणे यांच्यासह संपूर्ण कुटुंब भाजपमध्ये गेल्यानंतर हा संघर्ष काही प्रमाणात कमी होईल, अशी शक्यता होती. परंतु, भाजप उमेदवार नितेश राणे यांच्याविरुद्ध कणकवलीतून शिवसेनेने सतीश सावंत यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे युती असली तरी कणकवलीत भाजप-शिवसेना यांच्यात लढत रंगणार आहे.
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आपला स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन केल्यानंतर त्यांचे पुत्र नितेश यांना या मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तत्पूर्वी कणकवली येथून राणे कुटुंबीयांपैकी कुणाला उमेदवारी दिल्यास, शिवसेना ही जागा लढवणार असा इशारा आधीच देण्यात आला होता. परंतु, नितेश यांना उमेदवारी दिल्यामुळे शिवसेना पुन्हा एकदा राणेंसह भाजपच्या विरोधात उभी ठाकली आहे.
भाजपने शेवटच्या टप्प्यात नितेश यांना उमेदवारी दिली. त्यानंतर शिवसेनेकडून तातडीने सावंत यांना एबी फॉर्म देण्यात आला. त्यानंतर त्यांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित झाली. अशा स्थितीत कणकवलीत भाजप आणि शिवसेना अशी लढत पाहायला मिळणार आहे.
दरम्यान राणे यांच्या भाजप प्रवेशाला भाजपमधून काही प्रमाणात विरोध आहे. त्यामुळे हा गट शिवसेनेला मदत करण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत नितेश राणे यांच्यासमोर खडतर आव्हान असले तरी नारायण राणे यांचे मतदार संघातील वजन त्यांच्या विजयासाठी फायदेशीर ठरू शकते. एकूणच दोघांपैकी कोणताही उमेदवार निवडून आला तरी विजय युतीचाच होणार आहे.