महायुतीबाबत शिवसेना सकारात्मक
By admin | Published: July 15, 2016 12:22 AM2016-07-15T00:22:15+5:302016-07-15T00:22:15+5:30
महापालिका निवडणुकीसाठी भाजपाचे खासदार अमर साबळे यांनी शिवसेनेला युतीचा प्रस्ताव दिला. त्यानंतर भाजपाच्या नेत्यांनी खासदार आढळराव पाटील यांची अनौपचारिक भेट घेतली
पिंपरी : महापालिका निवडणुकीसाठी भाजपाचे खासदार अमर साबळे यांनी शिवसेनेला युतीचा प्रस्ताव दिला. त्यानंतर भाजपाच्या नेत्यांनी खासदार आढळराव पाटील यांची अनौपचारिक भेट घेतली. युतीच्या प्रस्तावावर सेनेनेही सकारात्मक प्रतिसाद दिला. ‘युतीच्या निर्णयाबाबत पक्षप्रमुख निर्णय घेतील, असे शिवसेनेच्या वतीने सांगण्यात आले. त्यामुळे प्राथमिक चर्चेत युतीबाबत सेनाही सकारात्मक असल्याचे दिसून येत आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. राष्ट्रवादी हटावचा आणि भ्रष्टाचारमुक्त महापालिका करण्याचा नारा भाजपाने दिला असून, महापालिकेत सत्ता मिळवायची असेल, तर शिवसेना-भाजपाची युती आवश्यक आहे,
अशी भूमिका साबळे यांनी
मांडून शिवसेनेपुढे युतीचा प्रस्ताव दिला होता. त्यानंतर युतीबाबत शिवसेनेची भूमिका काय असेल, याबाबत शहरातील राजकारणात उत्सुकता होती. भाजपा- सेनेच्या कार्यकर्त्यांतही युतीच्या निर्णयाबाबत उत्सुकता होती.
दरम्यान, भोसरी येथील खासदार आढळराव यांच्या कार्यालयास भाजपाचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, प्रदेशचे पदाधिकारी एकनाथ पवार, शहर सरचिटणीस सारंग कामतेकर यांनी सदिच्छा भेट दिली. त्या वेळी शिवसेनेचे पिंपरीचे आमदार गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख राहुल कलाटे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
महापालिका निवडणुकीबाबत भाजपाने शिवसेनेपुढे युतीचा प्रस्ताव दिला. त्याचे आम्ही स्वागत करतो. युतीबाबत आम्हीही सकारात्मक आहोत. मात्र, युतीबाबत निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आहे. प्रस्तावाची माहिती पक्षप्रमुखांना देऊ.
- शिवाजीराव आढळराव पाटील (खासदार)
भाजपाने युतीचा हात पुढे केला आहे. त्याचे आम्ही स्वागत करतो. युतीबाबत आम्हीही सकारात्मकच आहोत. याबाबत निर्णय घेण्याचा सर्वस्वी अधिकार पक्षप्रमुखांचा आहे. ते निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल.- राहुल कलाटे
(शहरप्रमुख, शिवसेना)