Maharashtra Politics: “आपण हुकूमशहासारखे वागा अन् इतरांना लोकशाहीचे बुस्टर डोस, हे भंपक प्रयोग ब्रिटनने राबवले नाही”

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2022 09:10 AM2022-10-27T09:10:27+5:302022-10-27T09:11:42+5:30

Maharashtra News: ब्रिटनचे नवे पंतप्रधान ऋषी सुनक यांचे तोंडभरून कौतुक करताना भारतातील मोदी सरकार आणि भाजपवर अप्रत्यक्षरित्या बोचरी टीका केली आहे.

shiv sena praising britain pm rishi sunak and criticised central modi govt and bjp in saamana editorial | Maharashtra Politics: “आपण हुकूमशहासारखे वागा अन् इतरांना लोकशाहीचे बुस्टर डोस, हे भंपक प्रयोग ब्रिटनने राबवले नाही”

Maharashtra Politics: “आपण हुकूमशहासारखे वागा अन् इतरांना लोकशाहीचे बुस्टर डोस, हे भंपक प्रयोग ब्रिटनने राबवले नाही”

googlenewsNext

Maharashtra Politics: ब्रिटनच्या पंतप्रधानपदी भारतीय वंशाच्या ऋषी सुनक (rishi sunak) विराजमान झाले अन् एक इतिहास घडल्याची चर्चा सर्वत्र आहे. ज्या ब्रिटिशांनी हिंदुस्थानवर दीडशे वर्षे राज्य केले, त्या ब्रिटनच्या सत्तेची सूत्रे भविष्यात कधी काळी हिंदुस्थानी मूळ असलेल्या व्यक्तीच्या हाती येतील, याचा स्वातंत्र्यपूर्व काळात कुणी स्वप्नातही विचार केला नसता. हे प्रत्यक्षात घडले हा काळाचा मोठाच महिमा म्हणावा लागेल. ऋषी सुनक यांचे कौतुक करताना शिवसेनेने देशातील मोदी सरकारला खोचक टोला लगावला आहे. 

शिवसेनेने आपले मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखात ऋषी सुनक यांच्यावर स्तुतिसुमने उधळली आहेत. ज्या ब्रिटिशांनी हिंदुस्थानचे प्रचंड शोषण करून येथील साऱ्या साधनसंपत्तीची दीडशे वर्षे लूट केली, त्याच इंग्रजांच्या देशात वंशाने हिंदुस्थानी असलेली एक व्यक्ती आज पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर स्थानापन्न झाली आहे. ऋषी सुनक यांच्या रूपाने ब्रिटनच्या पंतप्रधानपदी एका हिंदुस्थानी व्यक्तीने आरूढ होणे हा ब्रिटिशांवर काळाने उगवलेला सूड वगैरे आहे, या उथळ बाजारगप्पांना तसा अर्थ नाही. काळ बदलला, परिस्थिती बदलली, जग बदलले तसे ब्रिटिशही बदलले, असे शिवसेनेने म्हटले आहे. 

असे भंपक प्रयोग ब्रिटनने कधीच राबवले नाहीत

‘लोकशाही’ हा शब्द ब्रिटनने केवळ तोंडी लावण्यापुरता वापरला नाही, तर ‘आदर्श लोकशाही’ म्हणजे काय हे ब्रिटनने जगाला सांगितले. लोकशाही म्हणजे उदारमतवाद, हा व्यापक विचार घेऊनच ब्रिटनची राज्यव्यवस्था काम करत राहिली. राज्यकर्त्याने ‘हुकूमशहा’सारखे वागायचे आणि देशातील जनतेला व विरोधकांना मात्र लोकशाहीचे बुस्टर डोस पाजायचे असे भंपक प्रयोग ब्रिटनने कधीच राबवले नाहीत, असा टोला शिवसेनेने केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपला लगावला आहे. 

‘मला फक्त साठ महिने द्या…’ वगैरे बाता केल्या नाहीत

कोविड काळातील नियम मोडून पार्टीला जाणाऱ्या बोरिस जॉन्सन यांच्यावर टीका होताच त्यांना पंतप्रधानपद सोडावे लागले. ‘सोशल डिस्टन्सिंग’चा जो नियम जनतेसाठी केला त्याचे पालन राज्यकर्ता म्हणून पंतप्रधानांनीही केलेच पाहिजे, असा टीकेचा सूर ब्रिटनमध्ये उमटताच, खुर्चीला चिकटून न बसता जॉन्सन यांनी पंतप्रधानपद सोडले. केवढी ही प्रगल्भ लोकशाही! जॉन्सन यांच्या मंत्रिमंडळात ऋषी सुनक हे अर्थमंत्री होते. जॉन्सन यांच्यानंतर पंतप्रधान होण्याची त्यांची संधी थोडक्यात हुकली. करकपातींची आमिषे दाखवणाऱ्या लिज ट्रस यांची त्या पदावर निवड झाली. अवघ्या दीड महिन्यापूर्वी पंतप्रधान झालेल्या लिज ट्रस यांनी शपथ घेतल्यानंतर काही दिवसांतच ब्रिटनची अर्थव्यवस्था हेलकावे खाऊ लागली. महागाई वाढली. पंतप्रधान ट्रस यांच्या ध्येयधोरणांवर चौफेर टीका झाली. त्यांनीदेखील त्यावर ‘मला फक्त साठ महिने द्या…’ वगैरे बाता न करता अवघ्या ४५ दिवसांत पंतप्रधानपदाचा त्याग केला. स्वपक्षातील नेत्यांकडूनही त्यांच्यावर टीकेचे बाण येत होते, पण त्यांचे गळे न दाबता किंवा टीकाकारांविरुद्ध सरकारी यंत्रणांचा गैरवापर न करता ट्रस यांनी लोकशाहीचा मान राखला व पंतप्रधानपद सोडले, असे सांगत भाजप आणि मोदी सरकारवर अप्रत्यक्षरित्या हल्लाबोल केला. 

दरम्यान, ऋषी सुनक यांची नवे पंतप्रधान म्हणून निवड झाली. परिपक्व लोकशाही असते ती ही! ऋषी सुनक यांची ‘विद्वान राजकारणी’ म्हणूनच ब्रिटनमध्ये ओळख आहे. २०१५ मध्ये पहिल्यांदा खासदार झाले तेव्हा ऋषी सुनक यांनी भगवद्गीतेला स्मरून शपथ घेतली होती. ब्रिटिशांनी आपल्याकडे पाऊल ठेवण्यापूर्वी हिंदुस्थानात सोन्याचा धूर निघत होता असे म्हणतात. ते वैभव ब्रिटिशांनीच लुटून नेले. आता ब्रिटनमध्ये ‘सोन्याचा धूर’ निघावा याची जबाबदारी नियतीने एका हिंदुस्थानी ‘ऋषी’वर सोपवावी हा एक विलक्षण योगायोग म्हणावा लागेल! ब्रिटनमध्ये आर्थिक सुबत्ता आणण्याच्या कार्यात ‘ऋषी’राज यशस्वी होवो आणि एका हिंदुस्थानीचे नाव ब्रिटिशांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कायमचे कोरले जावे, अशीच सद्भावना आज प्रत्येक हिंदुस्थानी मनोमन बाळगून आहे, या शब्दांत शिवसेनेने ऋषी सुनक यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: shiv sena praising britain pm rishi sunak and criticised central modi govt and bjp in saamana editorial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.