Maharashtra Political Crisis: “मुलांच्या विधानाची जबाबदारी राणेंवर, सोबत काम करायचं असेल तर...”; केसरकरांचे प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 02:50 PM2022-07-15T14:50:00+5:302022-07-15T14:51:00+5:30
Maharashtra Political Crisis: दीपक केसरकर आणि राणे पिता-पुत्रांमधील वाद शमणार की, वाढणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांसह बंडखोरी केली आणि भाजपसह नवे सरकार स्थापन केले. बंडखोरी का केली, यापुढची भूमिका काय, हे सर्वांना माहिती होण्यासाठी शिंदे गटाकडून दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्याकडे प्रवक्तेपदाची धुरा देण्यात आली. अलीकडेच केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांचे सुपुत्र निलेश राणे (Nilesh Rane) यांनी दीपक केसरकर यांना उद्देशून केलेल्या ट्विटचा समाचार त्यांनी घेतला आहे.
माजी खासदार निलेश राणे यांनी केसरकरांना उद्देशून ट्वीट केले होते. यात उद्धव ठाकरेंबद्दल एवढे प्रेम असेल तर मातोश्रीवर भांडी घासावी असे म्हटले होते. यावर, नारायण राणेंच्या मुलाने केलेले ट्विट माझा अपमान आहे. यानंतर मात्र सिंधुदुर्गातल्या एकाही शिवसैनिकाला निषेध करावासा वाटला नाही, अशी खंत दीपक केसरकर यांनी व्यक्त केली. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंनी एकत्र यावे ही भूमिका मी सतत मांडत राहिलोय. पण किती दिवस वाट बघायची याला मर्यादा आहे. एकत्र येण्याच्या भूमिकेला रिस्पॉन्स द्यायचा की, नाही हे ठाकरेंनी ठरवायचे आम्ही वाट बघितली आता जनतेच्या कामाला लागलोय. पुनर्नियुक्त्या आणि पक्षातील इतर बाबींविषयी एकनाथ शिंदेच निर्णय घेतील आणि बोलतील, असे केसरकर यांनी स्पष्ट केले आहे.
तर मी प्रत्यक्ष नारायण राणेंशी बोलेन
राणेंची मुले कशी बोलतात याची काळजी घेण्याची जबाबदारी नारायण राणेंची आहे. नारायण राणेंशी माझा वाद नाही, त्याचे कार्यकर्ते जे वागतात त्यावर आक्षेप आहे. राणे त्यांच्या मुलांची काळजी घेण्यास समर्थ आहेत. मला सिंधुदुर्गाच्या हितासाठी जर राणेंसोबत काम करायचे असेल तर मी प्रत्यक्ष राणेंशी बोलेन, त्यांच्या मुलांशी का बोलेन, अशी विचारणा करत, मी सिनिअर आहे. वयाने सिनिअर आहे, राणे साहेबांच्या वयाचा आहे. नारायण राणे यांच्याशी व्यक्तिगत माझा कुठलाही वाद नाही. ज्याक्षणी कार्यपद्धती सुधारेल, माझा काहीच वाद राहणार नाही. नारायण राणे यांच्यातील मॅचुरीटी अनेक वर्ष काम केल्यामुळे आहे. ते खालून वर आलेले कार्यकर्ते आहेत. त्यामुळे त्यांच्या व्यतिरिक्त जिल्ह्यात कुणाशी बोलावे असे माझे मत नाही, असे केसरकर यांनी स्पष्ट केले आहे.