शहाजीबापू म्हणतात, 'आनंदरावनाना' तुम्ही आमच्याकडे या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2022 10:08 PM2022-08-08T22:08:56+5:302022-08-08T22:09:43+5:30
"मुख्यमंत्री आमचा, आम्हीच सत्तेतले मोठे भाऊ"; कराडमध्ये रंगली राजकीय फटकेबाजी
प्रमोद सुकरे, लोकमत न्यूज नेटवर्क | कराड: शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे लोकप्रिय आमदार शहाजी बापू पाटील यांनी शनिवारी कराड मध्ये जोरदार राजकीय फटकेबाजी केली. "मी शिवसेनेचाच आमदार आहे, शिंदे मुख्यमंत्री असल्याने सत्तेत आम्हीच मोठे भाऊ आहोत; तेव्हा माजी आमदार आनंदराव पाटील यांच्याकडे पहात, तुम्ही आता आमच्याकडे या", अशी गुगली टाकताच उपस्थितांच्यात खसखस पिकली. 'काय ती झाडी, काय ते डोंगर, काय ते हाटिल, ओक्केच'! या डायलॉगने लोकप्रिय ठरलेले सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील कराडात एका हॉटेलच्या उद्घाटनाला आले होते. त्यावेळी व्यासपीठावर भाजपचे युवा नेते डॉ. अतुल भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील, हुतात्मा संकुलाचे गौरव नायकवडी, कराडचे माजी नगराध्यक्ष जयवंतराव पाटील, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
आमदार शहाजी पाटील म्हणाले की, माझा आणि कराडचा जवळचा संबंध आहे. माझं शिक्षणच कराडात झाले आहे. म्हणून या कार्यक्रमाला आलो. इथे मी शिवसेनेचा आमदार म्हणून उपस्थित आहे. डॉ.अतुल भोसले भाजपचे नेते आहेत तर आनंदराव पाटील यांच्याकडे पाहत, नाना तुम्ही सध्या कुठल्या पक्षात आहात ?असे विचारत आता आमच्याकडे या अशी जाहीर ऑफर त्यांनी दिली. त्यांच्या या वाक्याला कराडकरांनी टाळ्यांचा प्रतिसाद देत दाद दिली.
गुवाहाटीच्या प्रवासाबद्दल सांगताना ते म्हणाले की, तिथे गेल्यावर पहिल्यांदा आमच्या सर्व आमदारांचे फोन मागून घेतले होते. त्यामुळे काही दिवस मी पुस्तक वाचण्यात वेळ घालवला. जेव्हा एकनाथ शिंदेंना आमचे फोन काढून घेतल्याचे समजले, तेव्हा त्यांनी आम्हाला ते परत द्यायला लावले. मग त्यावर एकाचा फोन आला. मी माझ्या खोलीच्या खिडकीचा पडदा उघडला अन् फोन घेत बोलू लागलो. पुढचा म्हणाला कुठं आहे? कसं आहे? म्हणून पुढे दिसत होतं ते मी बोललो. 'काय झाडी, काय डोंगर, काय हाटिल ओक्केच!' पण त्या डायलॉगनं मला भलतंच लोकप्रिय केलं. अनेकांनी त्यावर गाणी केली. आणि त्यांना आर्थिक फायदा सुद्धा झाला आहे बरं !असं त्यांनी आवर्जून सांगितलं.
नानांनी गाठ सोडली...
आमदार शहाजी पाटील हॉटेलच्या उद्घाटनाला आले होते. उदघाटनासाठी रिबीन बांधण्यात आली होती. पण शहाजी पाटलांना ऐन वेळी ती गाठ सुटेना. मग माजी आमदार आनंदराव पाटलांनी ती गाठ सोडून रिबीन शहाजी पाटलांच्या हातात दिली. त्याचीही चर्चा खुसखुशीतपणे तालुक्यात सुरू आहे.
आता यांचा कोंबडा आरवणारच!
कराड दक्षिण भाजपचे युवा नेते डॉ.अतुल भोसले यांच्याबाबत बोलताना आमदार शहाजी पाटील म्हणाले, अतुल भोसलेंना तर विरोधकांनी सारखंच डालग्यात घालण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे .त्यांच्या कोंबड्याने जरा बाहेर पडायचा प्रयत्न केला की त्याला आत ढकलायचं, त्यावर झाकण ठेवायचं, प्रसंगी दगड ठेवायचा. पण आता काळ बदलला आहे. पुढच्या निवडणुकीत डॉ. अतुल भोसले यांचा कोंबडा आरवल्याशिवाय राहणार नाही. असे म्हणताच एकच हशा पिकला.
असा कामाचा उरक पाहिजे
शहाजी पाटील डॉ. अतुल भोसले यांना दिवंगत जयवंतराव भोसले यांच्या आठवणी सांगताना म्हणाले, जयवंतराव भोसले गळाभर कोट घालून ऑफिसला यायचे. त्यांना भेटायला दररोज मोठी गर्दी असायची; पण तासाभरातच सगळी गर्दी समाधानी होऊन परत जायची .खरंतर असा कामाचा उरक असला पाहिजे. असे त्यांनी आवर्जून सांगितले.
आनंदरावांची भाजप- राष्ट्रवादीत उठबस
विधान परिषदेचे माजी आमदार आनंदराव पाटील यांनी गत विधानसभा निवडणुकीवेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यापासून फारकत घेतली. त्या दोघांच्यात नेमके का अंतर पडले याबाबत उलट सुलट चर्चा आहेत. असो! सध्या त्यांची उठबस भाजप व राष्ट्रवादी नेत्यांच्यात आहे. पण त्यांनी स्वतः अजून कोणत्याच पक्षात प्रवेश केलेला नाही. त्यामुळे शहाजी पाटलांच्या ऑफरकडे ते कसे पाहतात यासाठी थोडे थांबावेच लागेल.