Maharashtra Political Crisis: “आत्मचिंतन करण्याची गरज त्यांनाच, माझ्या विचारात बदल नाही”; भावना गवळींचा ठाकरेंवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 02:37 PM2022-08-23T14:37:28+5:302022-08-23T14:38:38+5:30
Maharashtra Political Crisis: आम्ही सेनेतून बाहेर पडलेलो नाही. उलट भाजप आणि शिवसेनेची युती होती, तीच घट्ट केली, असे भावना गवळी यांनी म्हटले आहे.
Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीच्या धक्क्यातून अद्यापही शिवसेना सावरताना दिसत नाही. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) प्रचंड सक्रीय झाले आहेत. बंडखोर आमदार आणि खासदारांवर शिवसेनेकडून सातत्याने टीकास्त्र सोडले जात असून, गद्दार असेच संबोधन केले जात आहे. याला शिंदे गटात सामील झालेल्या खासदार भावना गवळी (Bhavana Gawali)) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आम्हाला दूर केले नसते तर १२ खासदार आणि ४० आमदार दूर गेले नसते. चुकले कोण याचे आत्मचिंतन करण्याची गरज त्यांनाच आहे, असा अप्रत्यक्ष निशाणा भावना गवळी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर साधला आहे.
तब्बल वर्षभरानंतर भावना गवळी आपल्या मतदारसंघात गेल्या आहेत. खासदार भावना गवळी यांच्या संस्थेत भ्रष्टाचार झाल्याची भाजप नेते किरीट सोमय्या यांनी तक्रर केल्यानंतर ईडीने त्यांच्याविरोधात कारवाई केली होती. तेव्हापासून खासदार गवळी मतदारसंघात आल्या नव्हत्या, असे सांगितले जात आहे. माझ्या विचारात फरक पडलेला नाही. तुम्ही आम्हाला विकासाच्या योजना देणार नाही, नेता आम्हाला भेटणार नाही तर जनता ही आम्हाला जवळ करणार नाही. मग चुकले कोण? याचे आत्मचिंतन करण्याची गरज त्यांनाच आहे, असे गवळी यांनी म्हटले आहे.
आम्ही सेनेतून बाहेर पडलेलो नाही, उलट युती घट्ट केली
आम्ही सेनेतून बाहेर पडलेलो नाही. आम्ही भाजप आणि शिवसेनेची युती होती, तीच घट्ट केली. टाळी एका हाताने कधीच वाजत नाही. उद्धव ठाकरे काय करत होते हे नाही माहिती आहे. उद्धव ठाकरे माझे नेतेच होते. म्हणून मी काहीतरी वेगळे बोलायला पाहिजे असे नाही. बोलायची वेळ आली तर मी २५ वर्षाची खासदार आहे, एक महिला आहे मग तेव्हा काय झालं? बरेच काही बोलता येते, असा सूचक इशाराही भावना गवळी यांनी उद्धव ठाकरेंना दिला. त्या एबीपी माझाशी बोलत होत्या.
दरम्यान, ईडीचा ससेमिरा असाताना मतदारांना थेट भेटू शकत नसले, तरी संपर्कात होते. मी दोन वर्षांची खासदार नाही. पाच टर्मची खासदार आहे. माझ्यात कुठलाही फरक पडलेला नाही. माझ्या मतदारांमध्ये फरक पडलेला नाही, असेही भावना गवळी यांनी म्हटले आहे.