“… आणि त्यांनी मंदिरातून देव चोरावेत तसे शिवसेनाप्रमुख चोरण्याचा प्रयत्न केला”
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 09:49 AM2023-01-23T09:49:25+5:302023-01-23T09:49:35+5:30
या चोरीत कोणतेही अडथळे येऊ नयेत यासाठी चोरांना पाठबळ व कवच देण्याचे काम देशाचे पंतप्रधान व गृहमंत्री करताना दिसत असल्याचा शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आरोप.
‘शिवसेना नावाचे अग्निकुंड आजही धगधगताना दिसत आहे. आत्मविश्वासाचे बळ असेल तर जगात तुमचा पराभव कोणीच करू शकणार नाही, हा शिवसेनाप्रमुखांचा मंत्र प्रत्येक शिवसैनिकाच्या मनात मशालीसारखा पेटता आहे. ही मशाल गेल्या पंचावन्न वर्षांत कुणालाच विझवता आली नाही. सध्या महाराष्ट्रात एक भलतेच राजकारण सुरू झाले आहे,’ असे सामनाच्या संपादकीयमधून म्हटले आहे.
त्यात शिवसेनाप्रमुखांची चोरी करण्याचा विषय प्रामुख्याने आहे, पण या चोरीमारीस देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री वगैरे लोकांनी हातभार लावावा याचे आश्चर्य वाटते. महाराष्ट्राला ढोंग मान्य नाही. शिवसेनाप्रमुख तर नेहमीच ढोंगबाजांच्या कंबरडय़ात लाथा घालीत राहिले. ढोंगबाजांचे मुखवटे त्यांनी जाहीरपणे फाडले, पण गेल्या पाचेक महिन्यांत महाराष्ट्रात ढोंगबाजीने कहर केला आहे. शिवसेनेचे मुखवटे लावून काही मंबाजी सत्तेत घुसले व त्यांनी मंदिरातून देव चोरावेत तसे शिवसेनाप्रमुख चोरण्याचा प्रयत्न केला. पुन्हा या चोरीत कोणतेही अडथळे येऊ नयेत यासाठी चोरांना पाठबळ व कवच देण्याचे काम देशाचे पंतप्रधान व गृहमंत्री करताना दिसत आहेत, असा आरोपही यातून करण्यात आला आहे.
काय म्हटलेय अग्रलेखात?
कुणी मंदिरातील मूर्ती चोरली तरी त्या चोरलेल्या मूर्तीचे मंदिर होऊ शकत नाही, ते श्रद्धास्थान ठरू शकत नाही. चोर मंदिरात घुसतात, चोरी करतात ती मूर्ती चोरून विकण्यासाठीच. महाराष्ट्रात नेमके तेच झाले आहे, पण त्याच चोरांचे सरदार सरकारी कवचकुंडलात वावरतात तेव्हा अधःपतनाची सुरुवात वेगाने होते, असे संपादकीयमध्ये नमूद करण्यात आलेय.
हे ढोंग नाही तर काय?
मोदी हे पंतप्रधान म्हणून चार दिवसांपूर्वी सर्व लवाजमा घेऊन मुंबईस आले. त्यांनी म्हणे अनेक प्रकल्पांचे भूमिपूजन, लोकार्पण केले. त्यांनी मुंबईच्या विकासासाठी काही घोषणा केल्या. ज्या मोदी सरकारने दोन महिन्यांपूर्वीच महाराष्ट्रातून सवादोन लाख कोटींचे उद्योग बाजूच्या गुजरात राज्यात पळवले, त्यांनी मुंबईत येऊन विकासावर भाष्य करावे हे ढोंग नाही तर काय? असा सवालही करण्यात आलाय.
तैलचित्र लावणे ढोंग
विधानसभेत बाळासाहेबांचे तैलचित्र लावणे हे एक ढोंग आहे. त्या तैलचित्रात निष्ठेचा आत्मा व तेज नसल्याने चाळीस बेइमानांच्या ढोंगाशिवाय त्या सोहळय़ात दुसरे काहीच दिसत नाही. मोदींची माणसे म्हणून ज्यांची छाती आज गर्वाने फुगली आहे, त्या फुग्यास टाचणी लावून हवा कमी करण्याचे काम महाराष्ट्राची जनता नक्कीच करणार आहे, असेही संपादकीयमध्ये नमूद करण्यात आलेय.