“त्या धर्मवीराच्या महान पित्याचा, छत्रपती शिवरायांचा अपमान करणारे ‘अण्णाजी पंत’ आज सत्तेवर”
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 09:26 AM2023-01-03T09:26:16+5:302023-01-03T09:27:33+5:30
शिवसेनेचा जोरदार हल्लाबोल.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाजांबद्दल केलेल्या विधानानंतर त्यांच्याविरोधात अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली. दरम्यान, यानंतर शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) सामनाच्या संपादकीयमधून आपली भूमिका मांडली आहे. “त्या धर्मवीराच्या महान पित्याचा, छत्रपती शिवरायांचा अपमान करणारे ‘अण्णाजी पंत’ आज सत्तेवर आहेत,” असे म्हणत जोरदार निशाणा साधला आहे.
‘छत्रपती संभाजी महाराजांच्या राजकीय, आर्थिक, धार्मिक धोरणांवर छत्रपती शिवाजी महाराजांचाच ठसा कोरलेला आढळतो. त्याच स्वराज्य रक्षणासाठी संभाजीराजांनी इतिहासातील सगळय़ात मोठा त्याग व बलिदान केले. एखादा तपस्वी व धर्मवीरच असे बलिदान करू शकतो. त्या धर्मवीराच्या महान पित्याचा, छत्रपती शिवरायांचा अपमान करणारे ‘अण्णाजी पंत’ आज सत्तेवर आहेत, राजभवनात ठाण मांडून बसले आहेत. त्यांना पाठीशी घालणारे अण्णाजी पंतांचे समर्थक अजित पवारांना तारतम्य बाळगण्याचा सल्ला देतात हीच खरी गंमत आहे. आधी शिवराय अपमानप्रकरणी राज्यपालांना हटवण्याची मागणी करा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे तारतम्य बाळगणार आहेत काय?’ असा सवाल सामनाच्या संपादकीयमधून करण्यात आला आहे.
कायम्हटलेयअग्रलेखात?
‘संभाजीराजांचे बलिदान हे धर्मासाठीच होते याबाबत कुणाच्याही मनात शंका नाही, पण छत्रपती शिवरायांनी जे स्वराज्य निर्माण केले त्या स्वराज्य रक्षणासाठीही छत्रपती संभाजीराजेंनी त्याग आणि बलिदान केले. अजित पवार म्हणतात, ‘‘छत्रपती संभाजीराजे स्वराज्य रक्षक होते. धर्मवीर नव्हते.’’ आम्ही म्हणतो, खरा धर्मवीरच स्वराज्याचा रक्षक असतो. तेव्हा त्यात उगाच श्लेष काढून कोणाला छाती पिटण्याची गरज नाही. मात्र यावरून उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांवर टीकेची झोड उठवली आहे,’ असेही यात म्हटले आहे.
‘महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांचा अपमान राज्यपाल कोश्यारी व भाजपच्या अनेक पुढाऱ्यांनी केला तेव्हा ‘‘राज्यपाल, तारतम्य बाळगा!’’ असे सांगण्याची हिंमत मुख्यमंत्र्यांना झाली नाही. कुणी शिवरायांना ‘माफीवीर’ म्हणाले, तर कुणी ‘इतिहासातील जुने नेते’ म्हणून शिवरायांची चेष्टा केली. हे काय तारतम्यास धरून होते?’ असा सवालही संपादकीयमधून करण्यात आलाय. शिवरायांच्या अपमानावर शेपूट घालून बसणारे संभाजीराजांच्या निमित्ताने तारतम्याची भाषा करू लागले आहेत. या मंडळींना संभाजीराजे कळलेच नाहीत, असंही यात नमूद करण्यात आलेय.