… या नागोबांना राहुल गांधी आयती संधी का देतात हाच संशोधनाचा विषय, सावरकर प्रकरणावरून शिवसेनेची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 08:31 AM2022-11-19T08:31:53+5:302022-11-19T08:32:42+5:30

सर्व उत्तम चाललेले असताना राहुल गांधी यांना सावरकरांच्या कथित माफीचा विषय काढून भाजप व मिंधे गटाच्या हाती कोलीत देण्याची गरज नव्हती - शिवसेना

shiv sena saamana editorial targets bjp criticize congress rahul gandhi bharat jodo yadtra swatantryaveer savarkar comment in his rally eknath shinde fadnavis | … या नागोबांना राहुल गांधी आयती संधी का देतात हाच संशोधनाचा विषय, सावरकर प्रकरणावरून शिवसेनेची टीका

… या नागोबांना राहुल गांधी आयती संधी का देतात हाच संशोधनाचा विषय, सावरकर प्रकरणावरून शिवसेनेची टीका

googlenewsNext

‘गेल्या आठ वर्षांपासून केंद्रात भाजपचे सरकार आहे,पण वीर सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्याची मागणी शिवसेना करीत असताना हे लोक बहिऱ्याची भूमिका वठवतात. यास ढोंग नाही म्हणायचे तर काय?’ असा सवाल शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून केला आहे.

‘वीर सावरकरांचा सन्मान होईल असे एकही काम फडणवीस – मोदी यांनी केले नाही. राहुल गांधी यांनी सावरकरांच्या माफीचा विषय काढताच भाजपवाल्यांचे निषेधाचे नागोबा बिळातून बाहेर पडतात व फूत्कार सोडतात, पण ही संधी या नागोबांना राहुल गांधी वारंवार का देतात,’ हाच संशोधनाचा विषय असल्याचे शिवसेनेने म्हटलेय.

काय म्हटलेय अग्रलेखात?
‘भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मिंधे गटाचे वीर सावरकर प्रेम अचानक उफाळून आले, पण त्यांना ही अशी उफाळण्याची संधी राहुल गांधी यांनी दिली. हा सर्व प्रकार टाळता आला असता तर बरे झाले असते. ‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रात येताच राहुल गांधी यांचे भव्य स्वागत झाले. जनतेचा प्रतिसादही उदंड लाभला. हे सर्व उत्तम चालले असताना राहुल गांधी यांना सावरकरांच्या कथित माफीचा विषय काढून भाजप व मिंधे गटाच्या हाती कोलीत देण्याची गरज नव्हती हे खरेच. त्यामुळे नकली हिंदुत्ववाद्यांना सावरकर प्रेमाचे आचकेउचके लागले,’ असे शिवसनेने म्हटलेय.

‘हा भारत जोडोचा विषय नव्हता’
‘राहुल गांधी व त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेण्यासाठी मिंधे गटाचे लोक काही ठिकाणी रस्त्यावर उतरले. मात्र पुण्यात या लोकांनी राहुल गांधींना सोडून सावरकरांनाच जोडे मारल्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली. सावरकरांचा अपमान राहुल गांधींनी केला व त्याचा निषेध केला पाहिजे, पण निषेध करण्यासाठी ज्यांना रस्त्यावर उतरवले त्यांना राहुल व सावरकर यांच्यातला फरक कळला नाही, असा एपंदरीत हिंदुत्वाचा गोंधळ सरकारात उडालेला दिसतोय. वीर सावरकर हे अंदमानच्या काळय़ा पाण्यातून इंग्रजांची माफी मागून सुटले की फ्रान्स येथे मारिया बोटीतून उडी मारून निसटले, हा काही राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेचा विषय नव्हता,’ असे यात शिवसेनेने नमूद केलेय.

‘काँग्रेस नेत्यांची अवस्था अवघडल्यासारखी’
‘कथित माफी प्रकरणाचा कोळसा उगाळल्याने राज्यातील काँग्रेस नेत्यांची अवस्थाही अवघडल्यासारखी झाली असेल. या सगळय़ाची गरज नव्हती, पण हे श्राहुल गांधी यांना सांगायचे कोणी? सावरकर हे देशातील सशस्त्र क्रांतिकारकांचे शिरोमणी होते,’ असेही संपादकीयमध्ये म्हटले आहे.

Web Title: shiv sena saamana editorial targets bjp criticize congress rahul gandhi bharat jodo yadtra swatantryaveer savarkar comment in his rally eknath shinde fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.