‘…तशी लोकांच्या घराघरांवर मिंधे-फडणवीस सरकारमुळे सोन्याची कौले चढली,’ शिवसेनेचा टीकेचा बाण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2022 07:56 AM2022-10-29T07:56:01+5:302022-10-29T07:58:49+5:30
'मुख्यमंत्र्यांच्या भाषेतील हा ‘सकारात्मक’ बदल राज्यात घडत आहे तो मिंध्यांनी तीन महिन्यांपूर्वी सामना जिंकल्यामुळेच,' शिवसेनेचा हल्लाबोल.
'अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांच्या घरचे दिवे अजूनही विझलेलेच का आहेत, याचे उत्तर कृषीमंत्र्यांच्या या प्रश्नात दडलेले आहे. मुख्यमंत्र्यांच्या भाषेतील हा ‘सकारात्मक’ बदल राज्यात घडत आहे तो मिंध्यांनी तीन महिन्यांपूर्वी सामना जिंकल्यामुळेच!,' असे म्हणत शिवसेनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेचा बाण सोडला आहे.
'सध्या राज्यात जे बरे घडते आहे ते फक्त तीन महिन्यांपूर्वी जो सामना मिंधे गटाने जिंकला त्यामुळेच. मुख्यमंत्री एकीकडे 30 लाख शेतकऱ्यांना चार हजार कोटींची मदत दिली असे ‘बुडबुडे’ सोडत आहेत तर तिकडे उद्ध्वस्त शेतकरी ‘मदत देता का, मदत?’ असा टाहो सरकारकडे फोडीत आहे आणि राज्याचे कृषीमंत्री जिल्हाधिकाऱ्यांना ‘तुम्ही दारू घेता का, दारू?’ असा प्रश्न करीत आहेत,' असेही शिवसेनेने म्हटलेय. शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.
'७५वर्षांतथाटमाटपाहिलानव्हता'
'धनतेरस, लक्ष्मीपूजन, पाडवा वगैरे प्रत्येक दिवस मस्त झगमगाटात साजरा झाला. व्यापारी वर्गाचे चोपडा पूजन झाले. नरक चतुर्दशीस अनेक नरकासुर पायाखाली कचाकच चिरडून मारले गेले. भाऊबीजेचा थाटही यावेळी वेगळाच होता. गेल्या 75 वर्षांत हा थाटमाट देशाने कधीच पाहिला नव्हता, पण हे सर्व घडू शकले ते दिल्लीत पंतप्रधान मोदी व महाराष्ट्रात मिंधे व फडणवीसांचे सरकार असल्यामुळेच,' असे सामनाच्या संपादकीयमध्ये म्हटले आहे.
'द्वारका जशी श्रीकृष्णामुळे एका क्षणात सोन्याची झाली, तशी महाराष्ट्रातही लोकांच्या घराघरांवर मिंधे-फडणवीस सरकारमुळे सोन्याची कौले चढली. लक्ष्मीपूजनही थाटामाटात झाले. मिंधे गटाने जो सामना तीन महिन्यांपूर्वी जिंकला त्या गटातील खेळाडू अचानक कुबेर बनले. त्या कुबेरांचे लक्ष्मीपूजन काही ठिकाणी झाले. या चाळीस जणांमुळे ‘सामना’ जिंकल्याचा आनंद असा की, एका दिवसात 1900 किलो सोन्याची खरेदी झाली,' असेही यात नमूद करण्यात आलेय.
खोकेबाजआमदारांमुळेसोन्याचाबाजारवधारला
मिंधे गटाने तीन महिन्यांपूर्वी सामना जिंकला आहे. त्यामुळे शिधा कशाला घ्यायचा, आपण सराफ बाजार आणि शेअर बाजारात जाऊ. त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शेअर बाजार वधारला. गुंतवणूकदार दोन लाख कोटींनी मालामाल झाले. मिंधे गटाच्या चाळीस खोकेबाज आमदारांमुळे सोन्याचा बाजार आणि शेअर बाजारही वधारला. हे सर्व शक्य झाले ते तीन महिन्यांपूर्वी मिंधे गटाने सामना जिंकल्यामुळेच, असे म्हणत शिवसेनेने टीकेचा बाण सोडला आहे.