“मुख्यमंत्री दावोसला बर्फ उडवायला निघाले, योगींनी नाकासमोरून ५ लाख कोटी उडवले”
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2023 08:02 AM2023-01-07T08:02:30+5:302023-01-07T08:04:07+5:30
शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नुकतीच मुंबईला भेट दिली. यानंतर योगी आदित्यनाथ मुंबईत आले आणि ५ लाख कोटींचे गुंतवणूक घेऊन गेल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता. दरम्यान, शिवसेनेने शिंदे सरकारवर यावरूनच जोरदार निशाणा साधत योगींनी नाकासमोरून 5 लाख कोटी उडवल्याचे म्हणत त्यावर बोलण्यास सांगितले आहे.
‘अयोध्येत महाराष्ट्र भवनाची जागा देण्याचे मान्य करून योगी महाराजांनी मुंबईतून 5 लाख कोटी नेले. म्हणजे महाराष्ट्राच्या हाती आवळा देऊन कोहळा काढण्याचाच हा प्रकार. पण सत्तेवर दुर्बळ, लाचार, बधिर सरकार असल्यावर दुसरे काय व्हायचे? मुख्यमंत्र्यांना फक्त चाळीस आमदारांच्या खोक्यांची काळजी. पुन्हा जमले तर शिवसेनेच्या महावृक्षाखालचा पाचोळाही गोळा करायचा आहे. तीन महिन्यांपूर्वी केलेल्या ‘क्रांती’वर थुकरट भाषणे करायची आहेत. महाराष्ट्राच्या विकासाकडे लक्ष द्यायला वेळ आहेच कुठे?’ असे म्हणत शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून मुख्यमंत्र्यांवर टीकेचा बाण सोडलाय.
काय म्हटलेय अग्रलेखात?
‘योगींच्या मुंबई भेटीत मुकेश अंबानी, कुमार मंगलम बिर्ला अशा अनेक बडय़ा उद्योगपतींच्या त्यांनी भेटीगाठी घेतल्या. पंतप्रधानांच्या पाच ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईतील उद्योगपतींनी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मुंबईत येऊन उद्योगपतींशी चर्चा करीत होते. येथील गुंतवणूकदारांना लखनौला येण्यासाठी निमंत्रित करीत होते, तेव्हा आपले मुख्यमंत्री नाशकातील पालापाचोळा-कचरा गोळा करून ठाकऱ्यांची शिवसेना फोडण्याचा आव आणीत होते व त्या पालापाचोळय़ासमोर दंड ठोकून भाषण करीत होते,’ असे म्हणत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय.
‘दावोसला बर्फात खेळण्यासाठी जातायत’
उत्तर प्रदेश-बिहारचे राज्यकर्ते मुंबईत येऊन येथील गुंतवणुकीची लूट करीत आहेत व मुख्यमंत्री शिवसेना पह्डण्याच्या कामात रमले आहेत. माणसाला त्याच्या लायकीपेक्षा वरचे पद मिळाले की हे असे घडायचेच. योगी मुंबईतून उत्तर प्रदेशात गुंतवणूक नेत आहेत व मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस व त्यांचे बिऱहाड पुढील महिन्यात गुंतवणूक आणण्यासाठी जर्मनीतील दावोसला बर्फात खेळण्यासाठी, बर्फ उडवण्यासाठी चालले असल्याचेही संपादकीयमध्ये नमूद केलेय.
‘गुजरातलाच पुढे खेचण्याचे धोरण’
पंतप्रधान मोदी यांनी देशासमोर ठेवलेल्या पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी देशातील प्रमुख राज्यांत स्पर्धा लागली आहे, पण ‘मॅचफिक्सिंग’ करून फक्त गुजरातलाच पुढे खेचण्याचे धोरण स्पष्ट दिसते व ते राष्ट्रासाठी घातक असल्याचेही यात म्हटलेय.