“…तर ते भांगेच्या नशेतील स्वप्न पाहतायत,” राऊतांच्या अटकेनंतर शिवसेनेचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2022 07:54 AM2022-08-02T07:54:04+5:302022-08-02T07:56:06+5:30
किती जणांना तुरुंगात टाकाल? तुरुंग कमी पडतील अशी वेळ तुमच्यावर आल्याशिवाय राहणार नाही - शिवसेना
पत्राचाळ कथित घोटाळा प्रकरणी ईडीनं शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना ईडीनं अटक केली आहे. त्यानंतर न्यायालयानं त्यांना ४ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली आहे. दरम्यान, यावरून ‘शिवसेनेने निशाणा साधत शिवरायांचे हे राज्य बुडावे, त्याआधी ते नामर्द करावे असे कुणास वाटत असेल तर ते भांगेच्या नशेत आहेत, भांगेच्या नशेतील स्वप्न ते पाहत आहेत. महाराष्ट्र आणि शिवसेना लढत राहील!,’ असं म्हणत संताप व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रावर तर एकापाठोपाठ घाव घालण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. महाराष्ट्र तोडायचा तर आधी शिवसेनेस संपवायलाच हवे. शिवसेना संपवायची तर फोडाफोडी, दहशत निर्माण करायची व त्याआधी संजय राऊत यांच्यासारखे लढाऊ व प्रखर बोलणारे, लिहिणारे, राज्यभर फिरणारे नेते खोट्या प्रकरणात गुंतवून तुरुंगात टाकायचे, हे असले उद्योग सुरू असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून जोरदार निशाणा साधला आहे.
काय म्हटलेय अग्रलेखात?
महाराष्ट्र काय किंवा शिवसेना काय कधीही झुकणार नाही. किती जणांना तुरुंगात टाकाल? तुरुंग कमी पडतील अशी वेळ तुमच्यावर आल्याशिवाय राहणार नाही, असे शिवसेनेने म्हटले आहे.
‘राजकारण नीच पातळीवर…’
महाराष्ट्राचे व देशाचे एकंदरीत राजकारण खालच्या पातळीवर नेऊन ठेवले गेलेच होते. पण ते आता किती नीच पातळीवर पोहोचले आहे ते दिसू लागले आहे. शिवसेना नेते व ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना ‘ईडी’ने अटक करताच शिंदे गटातील आमदारांनी आनंद व्यक्त केला तर भाजपच्या लोकांनी जल्लोष केला. मुख्यमंत्री शिंदे यांनी तर कमाल केली, “कर नाही त्याला डर कशाला’’ असे साळसूदपणे सांगून त्यांनी वेळ मारून नेली. ‘ईडी’ला घाबरून पळ कोणी काढला व दिल्लीत जाऊन कसे कोण शरणागत झाले हे देशाने पाहिले असल्याचेही त्यांनी म्हटलेय.
कारवाई राजकीय सुडापोटी
राऊत यांच्यावरील कारवाई आकसाने, राजकीय सूडापोटीच करण्यात आली आहे. त्यांना गोरेगावच्या पत्राचाळ प्रकरणाचे सूत्रधार ठरवण्यासाठी अनेक खोटे पुरावे उभे केले गेले. त्यांच्या घरावर धाड टाकली. मुळात कायदा व नियम या देशात राहिलाच नव्हता, पण आता राज्यघटना, लोकशाही वगैरे शब्दांचेही रोज हत्याकांड होत आहे, असेही अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.