मिंधे सरकारकडून मर्दानगीची अपेक्षा करणे म्हणजे रेड्याचे दूध काढण्यासारखेच, शिवसेनेची खरमरीत टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2022 07:20 AM2022-11-04T07:20:20+5:302022-11-04T07:21:45+5:30

१ नोव्हेंबरला आपले मिंधे मुख्यमंत्री कोठे होते? ते काय करीत होते? हा संशोधनाचा विषय, शिवसेनेचा निशाणा

shiv sena saamana editorial targets eknath shinde bjp government over belgaum 1 november black day marathi | मिंधे सरकारकडून मर्दानगीची अपेक्षा करणे म्हणजे रेड्याचे दूध काढण्यासारखेच, शिवसेनेची खरमरीत टीका

मिंधे सरकारकडून मर्दानगीची अपेक्षा करणे म्हणजे रेड्याचे दूध काढण्यासारखेच, शिवसेनेची खरमरीत टीका

Next

मराठी सीमा भागातील काळ्या दिनाकडे पाठ फिरवणाऱ्या डरपोक मिंधे सरकारकडून ही मर्दानगीची अपेक्षा करणे म्हणजे रेडय़ाचे दूध काढण्यासारखेच आहे. स्वाभिमान, अस्मिता या शब्दांचे मोल त्यांच्या लेखी खरोखरच असते तर बेळगावच्या आंदोलनात कधी काळी खाल्लेल्या लाठीचे भांडवल थांबवून मुख्यमंत्री व त्यांचे मिंधे सरकार बेळगावच्या काळय़ा दिनाकडे पाठ फिरवून सातारच्या फार्म हाऊसवर बसले नसते, असे म्हणत शिवसेनेने शिंदे सरकारवर खरमरीत टीका केली आहे.

सीमा भागातील मराठी बांधवांनो, तुमचा लढा, शिवसैनिकांनी सांडलेले रक्त व 69 हुतात्म्यांचे बलिदान वाया जाणार नाही. एक दिवस नक्कीच उगवेल, त्या दिवशी काळय़ा दिवसाचे विजयीदिवसात रूपांतर झालेले पाहता येईल! मिंधे सरकार औटघटकेचे आहे, शिवसेना ही सदैव व नेहमीच तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, असे म्हणत शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून टीकेचा बाण सोडला.

काय म्हटलेय अग्रलेखात?
एक नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या सीमा भागात काळा दिन पाळण्यात आला. पण महाराष्ट्रातील मिंधे सरकारच्या खिजगणतीतही हा दिवस नसावा याचे दुःख वाटते. महाराष्ट्राचा स्वाभिमान, अस्मिता वगैरे प्रश्नांवर मिंधे गटाने शिवसेनेतून फुटून भाजपशी पाट लावला. पण सीमा भाग आणि बेळगावचा लढा या महाराष्ट्र अस्मितेच्या मुद्दय़ांवर शिवसेना जन्मापासून लढत राहिली, रक्त सांडत राहिली, बलिदाने देत राहिली. भाजपसोबत गेलेल्या मिंध्यांना या लढय़ाचे व सीमा भागात पाळण्यात आलेल्या काळय़ा दिनाचे विस्मरण झाले. 1 नोव्हेंबरला आपले मिंधे मुख्यमंत्री कोठे होते? ते काय करीत होते? हा संशोधनाचा विषय आहे, असे यात नमूद करण्यात आलेय.

‘खोके सरकार वाचवण्यावर चिंतन’
मुख्यमंत्री साताऱ्यातील त्यांच्या फार्म हाऊसवर आराम फर्मावीत होते. खोके सरकार कसे वाचवायचे त्यावर चिंतन करीत होते व त्याच वेळेला बेळगावसह सीमा भागातील मराठी जनता कानडी सरकारच्या अत्याचाराचा निषेध म्हणून काळा दिवस पाळून निषेध मोर्चा करीत होती. 1 नोव्हेंबर हा कर्नाटकातील सीमा भागात काळा दिन पाळला जातो याचे स्मरण भाजपच्या लेंग्याची नाडी बनलेल्या आपल्या मुख्यमंत्र्यांना आहे काय? शिवसेनेत असताना आपण बेळगावच्या आंदोलनात भुजबळांबरोबर गेलो व कानडी पोलिसांच्या लाठय़ा खाल्ल्या असे रसभरीत वर्णन आपले मिंधे मुख्यमंत्री करीत असतात. या महाशयांनी खरोखरच अशी कानडी लाठी खाल्ली असेल तर त्यांना सीमा भागाची वेदना कळली असती, असे शिवसेनेने म्हटलेय.

Web Title: shiv sena saamana editorial targets eknath shinde bjp government over belgaum 1 november black day marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.