‘मिंधे’ गटास पुढे करून कमळाबाई नियम, कायद्यास नाचवतेय; शिवसेनेची खरमरीत टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2022 09:36 AM2022-09-29T09:36:32+5:302022-09-29T09:36:54+5:30

"शिवसेना ही सतत पुढे जाणारी उसळती लाट आहे आणि लाट कधी मागे वळून पाहत नाही," शिवसेनेचा इशारा

shiv sena saamana editorial targets eknath shinde group bjp maharashtra political crisisi supreme court symbol | ‘मिंधे’ गटास पुढे करून कमळाबाई नियम, कायद्यास नाचवतेय; शिवसेनेची खरमरीत टीका

‘मिंधे’ गटास पुढे करून कमळाबाई नियम, कायद्यास नाचवतेय; शिवसेनेची खरमरीत टीका

googlenewsNext

गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेकडून सातत्यानं एकनाथ शिंदे गटावर हल्लाबोल केला जात आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात बुधवारी झालेल्या सुनावणीनंतर शिवसेनेनं पुन्हा एकदा शिंदे गटावर निशाणा साधला. 'आईला आई व बापाला बाप न मानणाऱयांची नवी अवलाद कमळाबाईने महाराष्ट्राच्या विरोधात उभी केली. सत्तापक्ष म्हणून मिळालेल्या अधिकारांचा अनिर्बंध वापर करून राजकीय स्वार्थासाठी घटनात्मक संस्थांना राजकीय अड्डे बनविण्याचा प्रयत्न करून देशभरात अराजक माजवणारे कितीही मस्तवाल झाले तरी आम्ही निश्चिंत आहोत. या देशात न्याय आहे. लोकशाही जिवंत आहे,' असे म्हणत शिवसेनेने टीकेचा बाण सोडला आहे.

'लोकशाही जिवंत आहे. कायदे, पुरावे आणि लोकभावना तुडवून कोणतीही घटनात्मक संस्था पुढे जाणार नाही, याविषयी आम्हाला खात्री आहे. सर्व प्रकारच्या लढाईस आम्ही सज्ज आहोत. सवाल न्याय आणि सत्याचा आहे! महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि अभिमानाचाही आहे. समझनेवालों को इशारा काफी है!,' असे म्हणत शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधला. 

काय म्हटलेय अग्रलेखात?
' महाराष्ट्रात एक बेकायदेशीर सरकार स्थापन झाले आहे. शिवसेनेतून एक गट बेइमानी करून फुटला. मुख्यमंत्रीपद, मंत्रीपद, खोक्यांचे आर्थिक व्यवहार करून त्यांनी विरोधी पक्षाशी हातमिळवणी केली व सत्ता स्थापन केली. पक्षादेश झुगारून पक्षांतरबंदी कायद्याचे उल्लंघन केले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसह 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई व्हावी हा मूळ विषय आहे; कारण या गटाने निवडणूक आयोगाकडे याचिका करण्यापूर्वी महाराष्ट्रात अनेक घडामोडी घडून गेल्या आहेत,' असे शिवसेनेने म्हटलेय.

काही दिवसांपासून ‘मिंधे’ गटाचे बेइमान आमदार जाहीरपणे सांगत होते, ‘‘काही झाले तरी आमच्या गटाचाच जय होईल. धनुष्यबाणाचे चिन्ह आम्हालाच मिळणार. सर्वोच्च न्यायालयात पाच-दहा वर्षे काही निकाल लागत नाही!’’ फुटलेले मिंधे आमदार अशी वक्तव्ये जाहीरपणे करतात तेव्हा देशाच्या घटनात्मक संस्थांच्या कार्यपद्धतीवर लोकांच्या मनात संशय निर्माण होतो. ‘मिंधे’ गटास पुढे करून कमळाबाई याप्रश्नी नियम व कायद्यास नाचवत आहे. सर्व घटनात्मक संस्था कमळाबाईने आपल्या ‘पदरी’ खोचून ठेवल्याने बेइमान गटास दिलासे मिळत आहेत, असे या गटास भासविले जात असल्याचे म्हणत शिवसेनेने भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधला.

शिवसेना ही सतत पुढे जाणारी उसळती लाट 
आमचा सर्वोच्च न्यायालयावर विश्वास आहे, तसा ‘घटनात्मक’ निवडणूक आयोगावरदेखील आहे. शिवसेनेची एक स्वतंत्र घटना आहे व त्याबरहुकूम निर्णय होत असतात. ‘मिंधे’ गटास वाटले म्हणून कमळाबाईंच्या कोठय़ावर दौलतजादा करून त्यांना शिवसेनेचे सत्त्व आणि स्वत्व विकत घेता येणार नाही. शिवसेना ही सतत पुढे जाणारी उसळती लाट आहे. लाट कधी मागे वळून पाहत नाही, असे म्हणत यातूनही इशाराही देण्यात आलाय.

Web Title: shiv sena saamana editorial targets eknath shinde group bjp maharashtra political crisisi supreme court symbol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.