शिवसेनेचा विरोध व महाराष्ट्रद्रोह या सूत्रानुसार शिंदे यांचा जीर्णोद्धार, शिवसेनेचा निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 01:21 PM2022-07-05T13:21:23+5:302022-07-05T13:22:09+5:30
सत्तेचा अमरपट्टा कुणीच सोबत घेऊन आलेले नाही. शिंदे त्यांचे सरकारही त्याच पद्धतीचे आहे - शिवसेना
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार स्थापन झालं. विधीमंडळात सरकारनं बहुमतही सिद्ध केलं. दरम्यान, यानंतर पुन्हा एकदा शिवसेनेनं सरकारवर निशाणा साधला आहे. शिवसेनेचा विरोध व महाराष्ट्रद्रोह या सूत्रानुसार शिंदे यांचा जीर्णोद्धार झाला. त्यामुळे शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांचे भविष्य अंधकारमय आहे, असं म्हणत शिवसेनेने सरकारवर जोरदार निशाणा साधला.
शिंदे हे म्हणे शिवसेना-भाजप ‘युती’चे मुख्यमंत्री असल्याचे जाणीवपूर्वक बोलून लोकांत भ्रम पसरवला जातो. हीच तर भाजपची कपटी खेळी आहे, असे म्हणत शिवसेनेनं टीकेचा बाण सोडला आहे. शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून यावर जोरदार निशाणा साधला.
काय म्हटलंय अग्रलेखात?
सत्तेचा अमरपट्टा कुणीच सोबत घेऊन आलेले नाही. शिंदे त्यांचे सरकारही त्याच पद्धतीचे आहे. सुरत, गुवाहाटी, गोव्यातून ते सरकार एखाद्या सांगाड्यासारखे भाजपच्या रुग्णवाहिकेतूनच अवतरले. बहुमत चाचणी जिंकल्यामुळे पुढचे सहा महिने या सरकारला धोका नाही असे ज्यांना वाटते ते भ्रमात आहेत, असे शिवसेनेने म्हटले आहे.
स्वातंत्र्यलढ्याचे बंड नाही
शिंद्यांचे बंड म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचे बंड नाही व त्यांच्यासोबत जे बंडखोर गुळाच्या ढेपेस चिकटले ते म्हणजे कोणी क्रांतिवीर नाहीत. बंडखोरांचे बोलणे व डोलणे काही दिवसांचे आहे. सत्ता व संपत्ती यासाठी झालेले बंड ऐतिहासिक व तात्त्विक नसते. त्यास नीतिमत्तेचा कितीही मुलामा दिला तरी त्या बंडाला तेज प्राप्त होत नाही! भाजपने घडवून आणलेल्या बंडाची तीच स्थिती आहे. बहुमत जिंकले. सहा महिने सत्ता भोगा. हाच सगळ्याचा गोषवारा आहे, असेही शिवसनेने नमूद केलेय.
अदृश्य शक्ती कोण?
काँग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार बहुमत चाचणीच्या वेळेस गैरहजर राहिले. अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार यांच्यासारखे ज्येष्ठ मंत्री विधानसभेत पोहोचू शकले नाहीत याचे आश्चर्य वाटते. देवेंद्र फडणवीस यांनी बहुमत चाचणी यशस्वी करणाऱ्या अदृश्य शक्तींचे आभार मानले आहेत. शिंदे हे किती मजबूत, महान नेते आहेत यावर त्यांनी भाष्य केले. पण फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापासून रोखणारी अदृश्य शक्ती कोण? हा प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे, असं त्यात म्हटलं आहे.