“त्यांच्या श्रीरामाची मान्यता असल्याशिवाय हनुमान भक्ताने पन्नास खोक्यांचे सत्य जाहीर केले का?”
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2022 07:30 AM2022-11-03T07:30:26+5:302022-11-03T07:31:00+5:30
राणा-कडू वादावरून शिवसेनेचा सवाल
रवी राणा हे फडणवीस यांना मानणारे आमदार आहेत व ते पक्के हनुमान भक्त आहेत. हनुमानाचा भक्त खोटे बोलेल काय? एकवचनी, सत्यवचनी रामाचा भक्त बजरंगबली रामाचे नाव घेऊन खोटे कसे बोलू शकेल? राणा यांचा राम कोण व बोलविता धनी कोण? याचा शोध कडू यांनी घेतला तर सत्याचा पट उलगडला जाईल, असे म्हणत शिवसेनेने कडू आणि राणा यांच्या वादात उडी घेतली आहे.
आता कितीही दिलगिरीचा मुलामा देऊन राणा यांनी माघार घेतली असली तरी या हनुमान भक्ताने आधी जे पन्नास पन्नास खोक्यांचे सत्य जाहीर केले, ते काय त्यांच्या श्रीरामाची मान्यता असल्याशिवाय? उद्या खोकेवाल्यांच्या घरात नाते जुळवायचे म्हटले तरी लोक मागे हटतील. काळाने सूड घ्यायला सुरुवात केली आहे. सत्य हे ‘कडू’च असते. त्याला कोण काय करणार? असे म्हणत शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून जोरदार टीका केली.
कायम्हटलेयअग्रलेखात?
सरकारला पाठिंबा देणारे दोन आमदार कडू आणि राणा यांच्यातील वाद संपला असे (उप)मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाहीर करावे लागले. फडणवीस यांच्यासमोर दोघांची कट्टी संपली व बट्टी झाली. त्यापाठोपाठ आमदार बच्चू कडू यांनीही ‘पहिली चूक’ म्हणून आमदार रवी राणा यांना माफी जाहीर केली. प्रहार पक्षाच्या अमरावतीमधील मेळाव्यात बोलताना कडू यांनी राणा यांच्या आरोपाचे कडू घोट महप्रयासाने पचवले, असे यात नमूद करण्यात आलेय.
‘महाराष्ट्रानेतमाशापाहिला’
विकासासाठी निधी कमी पडत आहे, ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागत आहेत यावर दोन आमदारांनी शब्दांची ढाल-तलवार चालवली असती तरी जनतेने त्यांचे स्वागत केले असते व त्यांच्या तोंडून निघालेली चिखलफेक सहन केली असती, पण दोन आमदारांचे भांडण ‘खोक्यां’वरून सुरू झाले व महाराष्ट्राने तमाशा पाहिला, असे म्हणत शिवसेनेने टीकेचा बाण सोडला.
‘मनापासून शब्द मागे घेतले का?’
(उप)मुख्यमंत्री महोदयांच्या भेटीनंतर राणा यांनी खोक्यांसंदर्भातले त्यांचे शब्द मागे घेतले आहेत. त्यांनी दिलगिरी वगैरे व्यक्त केली, पण राणा यांनी हे शब्द मनापासून मागे घेतले काय ही शंकाच आहे. कारण रवी राणा यांनी बुधवारी पुन्हा ‘आम्हाला कोणी धमक्या देत असेल तर त्याला घरात घुसून मारण्याची हिंमत आहे’, अशी थेट धमकीच कडू यांना दिली. त्यावर कडू यांनीही ‘मी 5 तारखेला घरी आहे. त्यांनी मारायला यावं’ असा प्रतिइशारा दिला आहे. म्हणजे राणा-कडू यांच्यातील वाद मिटलेला नाही असाच याचा अर्थ. अर्थात महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेच्या मनात 50 आमदारांची प्रतिमा ‘खोकेवाले’ अशीच आहे व हे आमदार कोठेही गेले तरी त्यांना ‘खोकेवाले’ असेच म्हटले जाणार. पन्नास आमदारांचे सरकार हे बेकायदेशीर आहे, असेही म्हटले आहे.