“महाराष्ट्राची मोठी गुंतवणूक ‘खोके कंपनी’त, आता वसुली सुरू झाल्याने गुंतवणूकदारांची पळापळ”
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 08:44 AM2022-09-22T08:44:41+5:302022-09-22T08:45:34+5:30
शिवसेनेची घणागाती टीका.
महाराष्ट्रात येणारा वेंदाता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यावरून गेल्या काही दिवसांपासून राज्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. शिंदे गटाकडून महाविकास आघाडीवर टीका करण्यात येतेय, तर महाविकास आघाडी शिंदे गटावर टीका करत आहे. आता पुन्हा एकदा यावरून शिवसेनेने टीकेचा बाण सोडला आहे. ‘महाराष्ट्राची मोठी गुंतवणूक ‘खोके कंपनी’त झाली. त्या खोक्यांची आता वसुली सुरू झाल्याने उद्योग व गुंतवणूकदारांची पळापळ सुरू आहे,’ असं म्हणत शिवसेनेने टीकेचा बाण सोडला.
‘गुजरातमधील गुंतवणूक वाढीची पोटदुखी महाराष्ट्राला नाही. एकदा भाऊ म्हटल्यावर वाद राहतोच कोठे? वाद निर्माण करून दुफळय़ा निर्माण करणारे दुसरेच आहेत. महाराष्ट्रातील वातावरण उद्योग-व्यापारासाठी सध्या निकोप नाही. गुजरात म्हणजे पाकिस्तान नाहीच, पण महाराष्ट्राला दुश्मन ठरवले जात आहे. महाराष्ट्राची प्रतिमा सुधारण्याचे आव्हान फडणवीस यांच्या समोर आहे. बाकी टक्केवारीचा नवा हिशेब घ्यायला शेलारांचे नियोजन मंडळ आहेच,’ असे म्हणत शिवसेनेने जोरदार हल्लाबोल केला. शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून टीका केली आहे.
काय म्हटलेय अग्रलेखात?
फॉक्सकॉन’ प्रकल्प महाराष्ट्रातून हिसकावून नेल्यापासून फडणवीस सरकार हे सगळय़ांच्याच टीकेचे लक्ष्य बनले आहे. शिंदे हे नामधारी मुख्यमंत्री आहेत व त्यांचे चाळीस आमदारही मुख्यमंत्री म्हणूनच वावरत आहेत. त्या अराजकातून राज्य चालविण्याची जबाबदारी फडणवीस यांच्यावर पडते. मुख्यमंत्री म्हणून शिंद्यांवर शिवसेना फोडण्याची, गणपती दर्शन, उत्सव मंडळे, पूजा, लग्न समारंभांना भेटी देण्याची जबाबदारी आहे. फडणवीसांवर राजशकट हाकण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे ‘फॉक्सकॉन’ प्रकरणात फडणवीस काय म्हणतात याकडेच गांभीर्याने पाहिले जाते, असे शिवसेनेने म्हटलेय.
महाराष्ट्रालाही दुःख देताय
गुजरातची पाकिस्तानशी तुलना करून तुम्ही महाराष्ट्रालाही दुःख देत आहात. ‘फॉक्सकॉन’सह इतर अनेक प्रकल्प बाजूच्या राज्यांत गेले. ते कोठे गेले यापेक्षा महाराष्ट्राने ते गमावले याची टोचणी आहे. राज्यात गुंतवणूक यावी यासाठी पूरक वातावरण निर्माण करावे लागते. असे वातावरण असणे हे महाराष्ट्राचे वैशिष्ट्य होते. मात्र आजच्या सत्ताधाऱ्यांचे त्याकडे लक्ष नाही. महाराष्ट्राचे वातावरण हे तणावाचे, अस्थिरतेचे व स्फोटक आहे. भाजपच्या प्रेरणेने शिंदे गट जिल्हय़ाजिल्हय़ांत स्वतःच्या टोळय़ा निर्माण करून ठग आणि पेंढाऱ्यांप्रमाणे काम करीत असल्याचे अग्रलेखात नमूद करण्यात आलेय.
काही लोक असे असतात की, ते ज्याची सत्ता तिकडे आपली टोळी जोडतात व पेंढाऱ्यांप्रमाणे लूट करतात. असे वातावरण निर्माण होणे उद्योग, व्यापार वगैरेंसाठी बरे नाही. त्यात महाराष्ट्राचे हित आहे काय? याचा विचार फडणवीस यांनी करायचा आहे. मुंबई-महाराष्ट्राचे वैशिष्टय़. मुंबई सगळय़ा देशाचे पोट भरते, पण मुंबई-महाराष्ट्राच्या पोटावर लाथ मारून कोणी वेगळे काही करत असेल तर मात्र महाराष्ट्राला वाघाचा पंजा मारावा लागेल, असे शिवसेनेने म्हटलेय.