“उर्फी जावेद प्रकरणात भाजपचेच वस्त्रहरण,” राऊतांचा 'रोखठोक' निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2023 12:28 PM2023-01-15T12:28:05+5:302023-01-15T12:30:56+5:30

संजय राऊत यांनी उर्फी जावेद आणि दिल्लीतील प्रकरणावरून भाजपवर जोरदार टीका केली.

shiv sena saamana rokthok sanjay raut targets bjp over uorfi jawed deepika padukone stand pathaan song | “उर्फी जावेद प्रकरणात भाजपचेच वस्त्रहरण,” राऊतांचा 'रोखठोक' निशाणा

“उर्फी जावेद प्रकरणात भाजपचेच वस्त्रहरण,” राऊतांचा 'रोखठोक' निशाणा

googlenewsNext

सध्या महाराष्ट्रात उर्फी जावेदचा विषय हा गाजत आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदच्या कपड्यांवरून तक्रार दाखल केली होती. त्यानंतर चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्या उत्तर प्रत्युत्तर सुरु होतं. दरम्यान, यानंतर खासदार संजय राऊत यांनी आपल्या रोखठोक या सदरातून उर्फी जावेद, पठाण अशा विषयांवरून टीका केली आहे. उर्फीमुळे भाजपचंच वस्त्रहरण झाल्याची टीकाही त्यांनी केलीये. 

मुंबईत उर्फी जावेदने भारतीय जनता पक्षाला कामास लावले. तिचे तोकडे कपडे, ‘पठाण’ चित्रपटामधील भगवी बिकिनी यावर भाजपची महिला आघाडी आंदोलन करते, पण दिल्लीच्या कंझावालमधील अंजलीस भाजपच्या पदाधिकाऱ्याने त्याच्या गाडीखाली चिरडून मारले यावर सरकारात व भाजपमध्ये सन्नाटा आहे! उर्फी प्रकरणात भाजपचेच वस्त्रहरण झाले. अंजली प्रकरणात भाजपचे ढोंग उघडे पडल्याचे राऊत यांनी आपल्या सदरात नमूद केलेय.

काय म्हटलेय राऊत यांनी?
महाराष्ट्रात सध्याचे राजकारण पूर्णपणे रसातळाला गेले आहे. ते इतके की, राज्यात सर्व प्रश्न संपले व कोण्या एका उर्फी जावेद या नवख्या नटीच्या तोकडय़ा कपडय़ांवर भारतीय जनता पक्षाच्या महिला नेत्या बोलू व डोलू लागल्या आहेत. उर्फी जावेद या कालपर्यंत अनोळखी असलेल्या नटीने मुंबईच्या रस्त्यावर कमी कपडय़ात शूटिंग केले. त्यामुळे हिंदू संस्कृतीचे वस्त्रहरण झाले, असे भारतीय जनता पक्षाला वाटते व त्यांनी त्या उर्फीविरुद्ध तशी मोहीम सुरू केली. या सगळय़ांचा परिणाम असा झाला की, या उर्फीला प्रसिद्धी मिळाली व तिचा भाव वधारला. त्यामुळे संस्कृतीचे वस्त्रहरण नक्की कोणी केले? ते भाजपने केले. उर्फीही भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा श्रीमती चित्रा वाघ यांच्यावर तुटून पडली. हे सर्व टाळता आले असते. संस्कृती रक्षणाच्या नावाखाली भाजप जी फौजदारी करीत आहेत ती अनावश्यक आहे. 

‘दिल्लीत काय घडले?’
उर्फी कोण? ती काय करते? या भानगडीशी सामान्य जनतेला काही पडले नाही. उर्फीने तोकडे कपडे घातल्याने बलात्कार वाढतील हा दावा हास्यास्पद आहे. महिलांवरील अत्याचार ही एक विकृती आहे. ही विकृती कायद्यावरही मात करीत असते. महाराष्ट्रातील भाजप मुंबईत उर्फी प्रकरणावर लढा देत असताना तिकडे देशाच्या राजधानीत जे घडले ते धक्कादायक होते. असभ्यता व क्रूरतेचे टोक गाठणारे कृत्य भाजपच्याच एका पदाधिकाऱ्याने केले.

अमृता फडणवीस उर्फीच्या बाजूने उभ्या राहिल्या
सर्व प्रकरणांवर आवाज न उठवता महिला नेत्यांनी उर्फी जावेदवर बोलण्यास प्राधान्य दिले. पण शेवटी उर्फी जावेदच्या बाजूने प्रत्यक्ष उभ्या राहिल्या त्या अमृता फडणवीस. या सर्व प्रकरणात त्यांनी स्वतंत्र बाणा दाखवून उर्फीच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याला पाठिंबा दिला. अमृता फडणवीस म्हणतात, ‘‘उर्फी एक स्त्री आहे. ती जे काही करतेय ते ती स्वतःसाठीच करत आहे. त्यामध्ये मला काही वावगे वाटत नाही.’’ थोडक्यात, श्रीमती फडणवीस यांचे म्हणणे आहे, ‘‘कपडय़ांत काय आहे? ‘व्यावसायिक’ गरजेनुसार आता प्रत्येक क्षेत्रात पोशाख आणि पेहराव येत असतो.’’

Web Title: shiv sena saamana rokthok sanjay raut targets bjp over uorfi jawed deepika padukone stand pathaan song

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.