"गोस्वामींविरोधातही भाजप जागोजागी गुन्हे दाखल करणार असतील तर खरे मर्द"

By जयदीप दाभोळकर | Published: January 21, 2021 08:21 AM2021-01-21T08:21:24+5:302021-01-21T08:22:32+5:30

शिवसेनेचा भाजपवर टीकेचा बाण

shiv sena saamna criticize bjp over republic tv arnab goswami amazon prime web series tandav controversy | "गोस्वामींविरोधातही भाजप जागोजागी गुन्हे दाखल करणार असतील तर खरे मर्द"

"गोस्वामींविरोधातही भाजप जागोजागी गुन्हे दाखल करणार असतील तर खरे मर्द"

googlenewsNext
ठळक मुद्देभारतीय जनता पक्ष म्हणजे सध्या हास्यविनोदाचा विषय, शिवसेनेची टीका

तांडव’चे निर्माते व दिग्दर्शकांविरोधात भाजपने उत्तर प्रदेश, बिहारात गुन्हे दाखल केले हे चांगलेच झाले, पण जवानांच्या हौतात्म्याचा अपमान करणाऱ्या गोस्वामीविरोधातही भाजप असे गुन्हे जागोजागी दाखल करणार असेल तर ते खरे मर्द, असं म्हणत शिवसेनेने भाजपवर टीकेचा बाण सोडला आहे. 

अर्णब गोस्वामीच्या देशद्रोहासंदर्भातदेखील चर्चा घडली तर पुलवामा हल्ल्यातील शहिदांचा आत्मा शांत होईल. शंभर ग्रॅम गांजा कुणाकडे पकडला म्हणून ‘तांडव’ करणारा मीडिया अर्णबच्या देशद्रोही कृत्यावर ‘राष्ट्रीय बहस’ करायला तयार नाही. कारण त्यांचे स्वातंत्र्य, राष्ट्राभिमान त्यांनी कुणाच्या तरी चरणावर गहाण ठेवला आहे. स्वातंत्र्याचा, राष्ट्रवादाचा लढा इतरांनी लढायचा, हे मात्र राष्ट्राचा चौथा स्तंभ म्हणून मिरवणार! सगळाच धंदा झालाय, दोष तरी कुणाला द्यायचा? ‘तांडव’ सुरू आहे, ते चालतच राहील, असेही शिवसेनेने म्हटले आहे. अर्णब आणि तांडव या प्रकरणावरून शिवसेनेने भाजपवर जोरदार टीका केली. 

काय म्हटलंय अग्रलेखात ?

भारतीय जनता पक्ष म्हणजे सध्या हास्यविनोदाचा विषय झाला आहे. रोज नवी सोंगे-ढोंगे आणून जनतेचे मनोरंजन करण्याचा प्रयोग ते करीत असतात, पण त्यांचे टुकार प्रयोग जनतेच्या पसंतीस उतरत नाहीत. ‘तांडव’ नावाची एक वेब सीरिज सध्या प्रदर्शित झाली आहे. सध्याच्या राजकारणाचे वास्तव दाखवणारी ही सीरिज असल्याचे सांगतात. दिल्लीचे राजकारण, विद्यापीठातील राजकीय चढाओढ असे काही विषय त्यात घेतले आहेत, पण या सीरिजमध्ये हिंदू देवदेवतांविषयी काही आक्षेपार्ह विधाने असल्याचा बोभाटा भारतीय जनता पक्षाने केला.

भगवान शंकर आणि नारदाच्या संवादातून श्रीरामाचा उल्लेख उपहासात्मक पद्धतीने झाल्याचे ‘तांडव’ भाजपने सुरू केले. हिंदू देवदेवतांबाबत कोणत्याही प्रकारची अपमानास्पद विधाने शिवसेनेने कधी खपवून घेतली नाहीत. एम.एफ. हुसेन हे नक्कीच महान चित्रकार होते, पण त्यांनी हिंदू देवतांची चित्रे ज्या पद्धतीने रेखाटली त्यावर शिवसेनेने आक्षेप घेतला. वाद इतका पेटला की, एम.एफ. हुसेन यांना देश सोडून जावे लागले. त्यामुळे हिंदू देवदेवतांच्या अवमानप्रश्नी कोणतीही तडजोड शक्यच नाही, पण भारतीय जनता पक्षाने जे ‘तांडव’ सुरू केले आहे, त्यात प्रामाणिकपणाचा लवलेश नक्की किती ही शंका आहेच. कारण जो ‘तांडव’विरोधात उभा ठाकला आहे तोच भाजप भारतमातेचा अवमान करणाऱया त्या अर्णब गोस्वामीसंबंधात तोंडात मिठाची गुळणी घेऊन गप्प का बसला आहे?

चीनने लडाखमध्ये घुसून हिंदुस्थानच्या जमिनीचा ताबा घेतला, चीन मागे हटायला तयार नाही यावर ‘तांडव’ का होत नाही? भारतीय जनता पक्षाने घेतलेल्या भूमिकांवर आक्षेप घ्यावे असे काहीच नाही, पण हिंदुत्व आणि भारतमातेचा अपमान फक्त ‘तांडव’पुरताच मर्यादित नाही. श्रीमान मोदी हे भगवान विष्णूंचे तेरावे अवतार आहेत, असे भाजपच्या प्रवक्त्यांनी सांगणे हा ‘तांडव’ पद्धतीचाच हिंदुत्वाचा अपमान आहे. ‘तांडव’ सीरिजमध्ये काही आक्षेपार्ह गोष्टी असतील आणि त्यात हिंदुत्व, आमच्या देवदेवतांचा अपमान असेल तर धार्मिक भावना दुखावल्याच्या मुद्दय़ावर कठोर कारवाई होईलच. 
 

Web Title: shiv sena saamna criticize bjp over republic tv arnab goswami amazon prime web series tandav controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.