"...यावरही भाजपच्या काही नाचे मंडळींचा आक्षेप, जमिनीवर काठ्या आपटून ‘साप साप’ म्हणून बोंबलत फिरतायत"

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 08:31 AM2022-01-11T08:31:23+5:302022-01-11T08:31:47+5:30

उत्तर प्रदेशमध्ये गंगेत वाहणारी प्रेतं आणि गुजरातमध्ये अंत्यसंस्कारासाठी दोन-दोन दिवस लागलेल्या रांगाची शिवसेनेने करुन दिली आठवण.

shiv sena saamna editorial criticize mumbai bjp over coronavirus taken care by thackeray government | "...यावरही भाजपच्या काही नाचे मंडळींचा आक्षेप, जमिनीवर काठ्या आपटून ‘साप साप’ म्हणून बोंबलत फिरतायत"

"...यावरही भाजपच्या काही नाचे मंडळींचा आक्षेप, जमिनीवर काठ्या आपटून ‘साप साप’ म्हणून बोंबलत फिरतायत"

Next

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारनं पुन्हा एकदा कठोर निर्बंध लादले आहे. यावर आक्षेप घेणाऱ्या भाजप नेत्यांवर शिवसेनेने जोरदार टीका केली आहे. दरम्यान, 'अमेरिकेसारख्या देशात कोरोनाचा विस्फोट होत आहे. त्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती नियंत्रणाखाली आहे. गंगेतील वाहत्या प्रवाहात कोरोनाग्रस्तांचे मृतदेह वाहताना जगाने पाहिले. गुजरातसारख्या राज्यात स्मशानात दोन दोन दिवस अंत्यसंस्कारासाठी रांगा लागल्या होत्या. मुंबई-महाराष्ट्राने शर्थ करून असे विदारक चित्र घडू दिले नाही,' असे शिवसेनेने म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोविडची लढाई राज्यांनी पुढे न्यावी. देशाला लाभलेले सध्याचे आरोग्यमंत्री मनसुख मांडवियाही उत्तम काम करीत आहेत. निदान मुंबईतील भाजपच्या नाच्यांनी त्यांना तरी अपशकून करू नये, असे म्हणत शिवसेनेने भाजप नेत्यांना टोला लगावला. शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून त्यांच्यावर टीकेचे बाण सोडले. 

काय म्हटलेय अग्रलेखात?
पंतप्रधान मोदी यांनी देशातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. निर्बंधांबाबत काटेकोर राहावे असे त्यांनी सरकारी यंत्रणांना सुचवले, पण याची सुरुवात पंतप्रधानांनी स्वतःपासूनच केली पाहिजे. वेगवान लसीकरणावर जोर द्यावा, असे त्यांनी सांगितले. मग मधल्या काळात शंभर कोटी लोकांना लस देण्याचा जो उत्सव साजरा झाला तो नक्की काय होता? सरकारी यंत्रणांवर आज प्रचंड ताण आहे. त्यात कोणाशीही चर्चा न करता पाच राज्यांतील निवडणुका जाहीर झाल्या आहेत. निवडणुकांचा मोसम हा कोरोना वेगाने वाढविण्याचा कारखानाच ठरतो. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांबाबत म्हणूनच चिंता वाटते. 

... हे तुमच्यापासून सुरू व्हायला हवं
तप्रधान मोदी यांनी एक उच्चस्तरीय बैठक घेतली. त्यात त्यांनी म्हणे देशाच्या जनतेला कळकळीचे आवाहन केले. ते म्हणतात, ‘‘झपाटय़ाने पसरणाऱ्या ओमायक्रोनच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी कायम सतर्क राहणे गरजेचे असून मास्कचा योग्य वापर व सामाजिक अंतर राखणे या गोष्टी आता आपल्या जगण्याचा एक भाग व्हायला हव्यात.’’ मोदी यांनी एकदम योग्य तेच सांगितले, पण हे सर्व तुमच्यापासून सुरू व्हायला हवे. पुतीनपासून बायडेनपर्यंत अनेक जागतिक नेत्यांसोबतच्या बैठकीत हे सर्व नेते ‘मास्क’ लावूनच बसलेले दिसतात. एकमेव अपवाद फक्त आमच्या पंतप्रधानांचा.

नाचे मंडळींना फक्त शेण दिसतं
मुंबई-महाराष्ट्रात कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकार उपाययोजना करीत आहे. मुंबईत अद्ययावत कोविड सेंटर्स उभारून लोकांना सेवा दिली जात आहे. लोकांचे प्राण वाचविले जात आहेत. यावरही भाजपच्या काही नाचे मंडळींचा त्यावर आक्षेप असून ते जमिनीवर काठय़ा आपटून ‘साप साप’ म्हणून बोंबलत फिरत आहेत. या नाचे मंडळींना नवाब मलिक यांनी कडक उत्तर दिले आहे. या नाचे मंडळींना गाय दूध देते हे दिसत नाही, तर फक्त शेण दिसते. खरेतर आता गाईच्या शेणातूनही अनेक ‘उपचार’ पद्धती सुरू झाल्या आहेत व शेणापासून इतर अनेक उपयुक्त उपक्रम संघ परिवाराच्याच गोशाळेत सुरू केले आहेत, या टोणग्यांना हे समजणार कधी? समाजाला लागलेली ही कीड आहे. चांगले चाललेले बघवले न जाण्याची पोटदुखी आहे. 

तेवढेच पुण्य पदरी पडेल
मुंबई-महाराष्ट्रात जे कार्य कोरोना महामारीशी लढण्याबाबत सुरू आहे ते देशात पहिल्या क्रमांकाचे आहे. तेव्हा उगाच जळफळाट करून खुसपटे काढण्यापेक्षा या सत्कार्याला हातभार लावून लोकांची सेवा करा. तेवढेच पुण्य पदरी पडेल, पण जे चांगले सुरू आहे त्यावर चिखलफेक करायची, यापेक्षा वेगळे उद्योग त्यांचे दिसत नाहीत.

Web Title: shiv sena saamna editorial criticize mumbai bjp over coronavirus taken care by thackeray government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.