हा शिवरायांचा महाराष्ट्र, आंधळा धृतराष्ट्र नाही; शिवसेनेचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2022 10:41 AM2022-07-02T10:41:14+5:302022-07-02T10:41:40+5:30
‘मन’ आणि ‘अपराध’ यांची सुस्पष्ट व्याख्या मांडणाऱ्या वाजपेयी युगाचा आणि त्यांच्या विचारसरणीचा देशाच्या राजकारणातून केव्हाच अस्त झाला आहे - शिवसेना
नुकतीच एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर गेले काही दिवस सुरू असलेल्या राज्यातील राजकीय नाट्याला पूर्णविराम मिळाला. दरम्यान, यानंतर शिवसेनेनं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला. महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री आणि पक्षादेश शिरोधार्य मानणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांच्या हातून महाराष्ट्रहिताचेच कार्य घडो हीच अपेक्षा आहे! हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, आंधळा धृतराष्ट्र नाही हे त्यांनी लक्षात ठेवावे, असे म्हणत शिवसेनेने निशाणा साधला.
‘मन’ आणि ‘अपराध’ यांची सुस्पष्ट व्याख्या मांडणाऱ्या वाजपेयी युगाचा आणि त्यांच्या विचारसरणीचा देशाच्या राजकारणातून केव्हाच अस्त झाला आहे. काळ्याचे पांढरे व पांढऱ्याचे काळे करणारे नवे युग आता तिथे अवतरले आहे. त्यामुळेच ‘छोटे मन’ आणि ‘मोठे मन’ यांच्या व्याख्या नव्याने सांगितल्या जात आहेत, असे म्हणत शिवसेनेने टोला लगावला. शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून निशाणा साधला.
काय म्हटलेय अग्रलेखात ?
कराराप्रमाणे दिलेला शब्द पाळण्याचे ‘मोठे मन’ भाजपने अडीच वर्षांपूर्वीच दाखवले असते तर बचाव म्हणून ‘मोठय़ा मना’ची ढाल समोर करण्याची वेळ त्या पक्षावर आली नसती. महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण करण्याचे जे राजकीय नाटय़ घडवले जात आहे, त्या नाट्याचे अद्याप किती अंक बाकी आहेत याविषयी आज तरी कोणीही ठामपणे काही सांगू शकेल असे वाटत नाही. घडामोडीच अशा घडत आहेत किंवा घडवल्या जात आहेत की, राजकीय पंडित, चाणक्य व पत्रपंडितांनीही डोक्याला हात लावून बसावे. स्ट्रोक-मास्टर स्ट्रोक असे नाटकाचे प्रयोग सादर केले गेले, असे शिवसेनेने म्हटले आहे.
एक पडदा पडला की दुसरा पडदा वर असेही प्रकार झाले. या संपूर्ण राजकीय नाट्याची पडद्यामागून सूत्रे हलविणाऱ्या तथाकथित ‘महाशक्तीं’चा ‘पर्दाफाश’ही मधल्या काळात झाला. निदान त्यानंतर तरी हे नाटय़ संपुष्टात येईल असा काहींचा कयास होता, मात्र तसे होताना दिसत नाही. उलट या नाटय़ात आणखी रंग भरण्याचे काम होताना दिसत आहे. शिवसेनेत बंडाळी घडवून महाराष्ट्राची सत्ता काबीज करायची हेच या नाटय़ाचे मुख्य उद्दिष्ट होते. त्यानुसार त्यातील पात्रांनी आपापली भूमिका वठवली, असेही शिवसेनेने नमूद केलेय.
सर्वात धक्कादायक असा क्लायमॅक्स झाला तो गुरुवारी संध्याकाळी राजभवनात या नाटकाचा शेवटचा वगैरे वाटणारा प्रयोग झाला तेव्हा. उपमुख्यमंत्री होणारे अचानक मुख्यमंत्री झाले आणि हमखास मुख्यमंत्री होणार असे वाटणाऱ्यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे लागले. पक्षादेश म्हणून ते त्यांनी स्वीकारलेही. या ‘क्लायमॅक्स’वर टीका, समीक्षण, परीक्षण असा भडिमार होत असताना ‘मोठे मन’ आणि ‘पक्षनिष्ठेचे पालन’ असा एक बचाव समोर आला.