Maharashtra Political Crisis: “उद्धव ठाकरे महाराष्ट्रात यशस्वी, पुढे जाऊन देशाचं नेतृत्व करतील या भीतीनं फोडाफोडी”
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 11:49 AM2022-07-25T11:49:56+5:302022-07-25T11:51:59+5:30
Maharashtra Political Crisis: आगामी निवडणुकीतून जनता उत्तर देईल, तेव्हा हेच आमदार आणि खासदार परततील, पण शिवसेनेचे दरवाजे बंद असतील, असे सूचक विधान शिवसेना नेत्याने केले.
Maharashtra Political Crisis: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या ऐतिहासिक बंडखोरीनंतर पक्षाला मोठेच खिंडार पडल्याचे पाहायला मिळत आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आता कंबर कसली असून, आदित्य ठाकरेही (Aaditya Thackeray) सक्रीय झाले आहेत. यांच्यासह शिवसेनेतील उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी असलेले आमदारही कामाला लागले आहेत. यातच आता उद्धव ठाकरे महाराष्ट्रात यशस्वी झाले आहेत, पुढे जाऊन देशाचे नेतृत्व करतील, याच भीतीने फोडाफोडीचे षड्यंत्र केले जात असल्याचा मोठा आरोप शिवसेना आमदार सचिन अहिर यांनी केला आहे. अलीकडेच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत जिंकले होते.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन महाराष्ट्राचे यशस्वी नेतृत्व करत होते. ते जर असेच यशस्वी झाले तर उद्या देशाचे नेतृत्व करतील, ही काहींच्या मनात भीती असल्याने फोडफोडीचे षड्यंत्र केले गेले. कोण कोणाला चिठ्ठ्या देतेय, माईक ओढून घेतेय, हे सर्व जनता बघतेय. जनता याला उत्तर देईल. कारण जनतेला हे आवडले नाही, असे सचिन अहिर यांनी सांगितले. ते पिंपरी-चिंचवड येथील एका कार्यक्रमात बोलत होते.
आगामी निवडणुकीतून जनता उत्तर देईल
आगामी निवडणुकीतून जनता उत्तर देईल, तेव्हा हेच आमदार आणि खासदार परततील, पण शिवसेनेचे दरवाजे त्यांच्यासाठी बंद असतील, असा सूचक इशाराही सचिन अहिर यांनी दिला. तत्पूर्वी, शिवसेनेला संपवण्याची जो भाषा करतो तो स्वतःच संपतो हा इतिहास आहे, असे सांगत नव्या उमेदीने कामाला लागा व भगवा घराघरांत पोहोचवा. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत विविध संकटांवर मात करत राज्याचा कारभार नेटाने चालवला. देशात नव्हे तर जगात आदर्श मुख्यमंत्री म्हणून नाव कमावले. हिंदुत्व हाच आमचा विचार आहे असे धाडसाने सांगणाऱ्या उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाला नेस्तनाबूत करण्यासाठी तुम्ही कट केला. तुम्ही खासदार, आमदार, माजी आमदार पळवाल, पण बाळासाहेबांचे विचार हिसकावून घेऊ शकणार नाही, असे परखड मत सचिन अहिर यांनी व्यक्त केले.
दरम्यान, खंजीर खुपला, खंजीर खुपसला हे जे काही वारंवार बोलले जात आहे, त्यावर असे बोलू शकतो की, जे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या बेड्यांमध्ये अडकलेत त्यांनी खंजीर खुपसल्याबद्दल बोलणे योग्य वाटत नाही. पण खंजीर कोणी कोणाच्या पाठीत खुपसला हे योग्य वेळ आल्यावर नक्की बोलेन, असा थेट इशाराच एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंनी केलेल्या टीकेवर प्रत्युत्तर देताना दिला. तसेच बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांची प्रतारणा कोणी केली, हे सर्वश्रूत आहे. निवडणुकीच्या वेळी एकीकडे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा फोटो होता तर दुसरीकडे मोदींचा फोटो होता. ज्यांच्याबरोबर आपण निवडून आलो. लोकांनी जे जनमत दिले ते तोडून मोडून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले त्यावर सर्व आमदारांना आक्षेप आहे. म्हणूनच आम्ही ही बाळासाहेबांच्या विचारांची भूमिका घेतली आहे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.